
शिरूर तालुक्याच्या बेट भागातील केबल चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील टाकळी हाजी येथील शिनगरवाडीतील चार शेतकऱ्यांच्या कुकडी नदीवरील कृषी पंपाच्या केबलची चोरी झाल्याने व साबळेवाडी परिसरात ही घोडनदी जवळ केबल चोऱ्या वाढल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.
शिरूर येथील अशोक सहादू पखाले, सखाराम गेणभाऊ खामकर, सणस विठोबा खामकर, बंडू पंढरीनाथ खामकर यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली आहे. सकाळी शेतकरी पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना रात्री केबलची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. आधीच नदीला पाणी नाही, रात्रीत नदीला जमा झालेले थोडेफार पाणी सकाळी शेताला देवून कसेबसे पिक पाणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असताना केबल चोरीने पुन्हा खर्च वाढल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यापूर्वी बेट भागासह कवठे येमाई,सविंदणे,घोडनदी किनारी असणारे शेती पंप अशा अनेक ठिकाणी केबल चोरीस गेल्या असून त्याचा तपास करण्यात पोलीस मात्र अपयशी ठरत असल्याने चोरांचे मनोबल वाढले आहे. पोलीस या घटना गांभीर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांना वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
टाकळी हाजी येथे पोलीस चौकी असून या भागात खुले आम सुरू असलेले अवैध धंदे, गौण खनिज उत्खनन , विद्युत रोहित्र तसेच कृषी पंप आणि केबल चोरी, शेतमाल व कृषी साहित्य चोरी या प्रकारांना अभय नक्की कुणाचे ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. टाकळी हाजी पोलीस चौकीतून बदली झाल्यानंतर पुन्हा तिथेच येण्यासाठी कर्मचारी लोकप्रतिनिधींकडे साकडे घालत असल्याने ही चौकी म्हणजे मलाई कमावण्याचे साधन तर नाही ना ? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकिवात येत आहे.