महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालात भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. त्या पराभवाची जबाबदारी घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार घणाघात केला. ”देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा काय देता, लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलं आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आहात. इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहलं जाईल”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
‘देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात दळभद्री सुडाचं कपटाचं राजकारण केलं. महाराष्ट्रात अमृताचा प्रवाह वाहत होता. सभ्यता संस्कृतीसाठी महाराष्ट्र ओळखळा जात होता. त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीने केलं. पेशवे काळात आनंदीबाई पेशवे होत्या. त्यांची लोकं ज्यासाठी आठवण काढतात. तसे फडणवीस हे महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत. जी कटुता आमच्या मनात आहे. त्याचं कारण ते स्वत: आहेत. महाराष्ट्रात जे सूडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं. जे या पूर्वी कधीच नव्हतं. त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला. लोकांना संधी मिळाली आणि लोकांनी त्यांचं फडतूस, महाराष्ट्राचा नाश- विनाश करणारं, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं राजकारण या महाराष्ट्रात चालणार नाही हे दाखवून दिलं. आता देखील काही चमचे त्यांच्या मागेपुढे धावत आहेत. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. दुर्दैवाने ते मराठी माणसंच आहेत.अशी माणसं संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही होती. ज्यांनी महाराष्ट्राला विरोध केला. तशीच माणसं फडणवीसांच्या मागे फिरत आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”मी अत्यंत कटूतेने बोलतोय. महाराष्ट्रातल्या राजकारणातली एक पिढी खतम करण्याचं काम त्यांनी केलं. हातातली सत्ता, सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी, राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी वापरला. न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तीना घरी बोलावून धमक्या देण्याचं काम फडणवीसांच्या टोळीने केले. पोलिसांचा राजकीय कामासाठी वापर केला. त्यांच्यावर दबाव आणला. या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोच. आज महाराष्ट्रातल्या राजकारणातले ते खलनायक आहे. मोदी शहांवर जेवढा राग नाही तेवढा फडणवीसांवर आहे”, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
”विदर्भात नितीन गडकरींची जागा सोडली. तर विदर्भात फडणवीस यांचा भाजप रसातळाला गेला. त्याला जबाबदार फडणवीस आहे. तुम्ही राजीनामा काय देता लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलं. महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं जातीचं, धर्माचं राजकारण, सूडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं. त्यामुळे एक चांगलं राज्य रसातळाला नेलं. आमच्यावर कारवाया केल्या, कारवाया आम्हालाही करता येतील भविष्यात. अनेक कार्यकर्ते आजही तुरुंगात आहेत. अनेकांचा छळ केला. त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला. ही काय पद्धत झाली राजकारण करण्याची. म्हणून तुमच्यावर रडण्याची वेळ या राज्याने आणली आहे. कालपर्यंत मी पुन्हा येईन, दोन पक्ष फोडून येईन असं म्हटलं. त्या दोन पक्षांनीच तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली मिस्टर फडणवीस. हे विसरू नका. अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. अजून विधानसभा. महापालिका निवडणूका यायच्या आहेत. तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली, मराठी माणसाच्या स्वाभिमानाची वाट लावली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही फोडली. याचा सूड महाराष्ट्र सातत्याने घेत राहिल. महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहलं जाईल, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष
एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा प्रस्ताव मंजूर झाला याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ”नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. दोन निवडणूकात 56 इंचाची नसलेली छाती पुढे काढून जात होते. ते चित्र आज दिसत नाही. मोदींचा चेहरा, बॉडि लँग्वेज बघा, भाषा पाहा. त्यांना पक्षामधून, संघाचा विरोध आहे . पराभूत व्यक्ती कसा पंतप्रधान होऊ शकतो. तुमच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव झाला आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय हे काय आहे? देशातल्या जनतेला मूर्ख समजता का? खरोखर लोकशाहीची चळ असेल तर संसदीय पक्षात मतदान घ्या. विचारा मोदी पाहिजे का. तुम्हाला उत्तर मिळेल. मोदींचा मार्ग सरळ नाही. मोदींनी सरकार बनवायचा प्रयत्न केला तरी त्यांचं सरकार टीकणार नाही. मोदींना पक्षातच विरोध आहे. मोदींची जी दादागिरी होती. ईडी सीबीआयच्या ताकदीवर, ती आता यापुढे चालणार नाही. आमच्यासारखे लोकं मरायला तयार आहे. असे असंख्य लोकं आहेत. संघाची टॉप लिडरशिप पर्यायाची चाचपणी करतेय. 2019 व 14 च्या पाशवी बहुमतानंतर त्यांनी संघालाच गुलाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघ एक निर्णय घेऊन त्यांना घऱी पाठवू शकतात. भाजपने नितीश कुमार व चंद्राबाबूंना कमी त्रास दिलेला नाही. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम नरेंद्र मोदी करतायत हे वक्तव्य चंद्राबाबूंचं आहे. त्यामुळे मी वारंवार सांगतोय की हे सरकार टिकणार नाही. आम्ही विचार करतोय की आता मोदी व त्यांच्या लोकांना सरकार बनवण्याची संधी द्यावी. हे अनैतिक सरकार पाडून येण्यात जी मजा आहे ते आता सरकार बनवण्यात नाही, असे संजय राऊत म्हणाले.