गोखले आणि बर्फीवाला पूल जोडणी अंतिम टप्प्यात; दोन्ही ब्रीजमधील उंची समांतर

 

गोखले ब्रीज आणि बर्फीवाला पूल जोडण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून दोन्ही पुलांतील अंतर समांतर होणार आहे. त्यामुळे शिल्लक काम वेगाने पूर्ण करा आणि दोन्ही पूल मुंबईकरांच्या सेवेत आणा, असे निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी पूल विभागाला दिले आहे.

पालिकेच्या व्हीजेटीआयच्या अहवालानंतर पुलाचे काम सुरू आहे. आयुक्त भूषण गगराणी यांनी आज गोखले ब्रीज येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱया गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल या दोन्ही पुलांतील उंचीत अडीच मीटरची तफावत आल्याने पालिकेला टीकेचा सामना करावा लागला. दोन्ही पुलाच्या उंचीत तांत्रिक कारण असल्याचे सांगत पालिकेने व्हीजेटीआय संस्थेच्या अहवालानंतर काम सुरू केले आहे. दरम्यान, आयुक्तांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यान (हँगिंग गार्डन), सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू महानगरपालिका बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे सकाळी भेट दिली. यावेळी सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त विश्वास शंकरवार, किशोर गांधी, विश्वास मोटे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे, एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान, के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू, सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण

सांताक्रुझ (पश्चिम) येथील लायन जुहू बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे गगराणी यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. आयुक्तांनी जुहू येथील पालिकेच्या कूपर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयालादेखील आयुक्त भूषण गगराणी भेट दिली. आलेल्या रुग्णांची विचारपूस करीत येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. तसेच के पूर्व अंधेरी विभागातील नागरी सुविधा पेंद्रालाही भेट देत कामकाजाची माहिती घेतली.