मुंबईत वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मुंबई वातावरण कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून वातावरणीय अर्थसंकल्पीय अहवाल आज जाहीर करण्यात आला. यानुसार पालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प 2024-25 मधील भांडवली खर्चाच्या 31,777.59 कोटी तरतुदीपैकी 32.18 टक्के म्हणजेच 10224.24 कोटींचा खर्च मुंबई वातावरण कृती आराखडय़ानुसार खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन बांधकामांमध्ये एलईडी दिवे, वृक्षारोपण, छतावरणी सौर दिवे आणि सांडपाणी प्रकल्प यांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी 2 हजार 163.8 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पहिला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल आज प्रकाशित करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. अशाप्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील आता चौथे शहर बनले आहे. यावेळी उपआयुक्त मिनेश पिंपळे, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
असा होणार खर्च
ऊर्जा आणि इमारती – 3,24,790 रुपये
एकात्मिक वाहतूक – 84,000 रुपये
शाश्वत कचरा व्यवस्थापन – 26,21,600 रुपये
शहरी हरितीकरण, जैवविविधता – 17,78,426 रुपये
हवेचा दर्जा – 3,53,840 रुपये
शहरी पूर, जल संपदा व्यवस्थापन – 9,70,79,774 रुपये