‘मातोश्री’बाहेर विजयी उमेदवार आणि शिवसैनिकांचा जल्लोष; ढोलताशांच्या तालावर धरला ठेका, शिवसेनेच्या जयघोषाने कलानगर दुमदुमले

 

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचा दणदणीत पराभव करून निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उत्तर-पूर्व मुंबईचे नवनिर्वाचित खासदार संजय दिना पाटील, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी, आमदार पैलास पाटील, रमेश कोरगावकर, विभागप्रमुख सुरेश पाटील, नाशिकचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात बाजी मारली. शिवसेनेला भरघोस यश मिळाले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आज सकाळपासून शिवसेनेचे विजयी उमेदवार आणि शिवसैनिकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यास आणि अभिनंदन करण्यास गर्दी केली होती. वाजतगाजत, गुलाल उधळत उमेदवार आणि असंख्य शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचले. यावेळी कलानगरचा परिसर शिवसेनेच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा विजय मिळाला. शिवसेनेचे नऊ शिलेदार घवघवीत यश मिळवून विजयी झाले. महाविकास आघाडीने राज्यात 30 जागा मिळवून मुसंडी मारली. मुंबईतही महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. या विजयाने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मातोश्रीबाहेर आज शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची तुडुंब गर्दी झाली होती.

कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची अशा जोरदार घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. पेढे वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ढोलताशांच्या तालावर फेर धरत विजयी जल्लोष केला. उद्धव ठाकरे यांनीही विजयी उमेदवारांचे आणि शिवसैनिकांचे अभिनंदन करतानाच हुकूमशाहीविरुद्ध शिवसेनेला मोठा विजय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेला धन्यवादही दिले.

विजयी उमेदवारांचे औक्षण

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे पानिपत करणारे शिवसेना उमेदवार संजय दिना पाटील असंख्य शिवसैनिकांसह वाजतगाजत मातोश्रीवर पोहोचले. नाशिक मतदारसंघातील विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे आणि धाराशीवमध्ये पुन्हा दणक्यात विजय मिळवणारे ओमराजे निंबाळकर हेसुद्धा सकाळीच मुंबईत दाखल होऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. त्यांच्यासोबत शेकडो शिवसैनिकही होते. विजयी उमेदवारांचे मातोश्रीवर औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रनुख उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेतली.