भाजपला कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज मोडून काढला, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

लढाईला आता सुरुवात झाली आहे. ही आपली पहिली लढाई होती. शिवसैनिकांची अफाट मेहनत आणि आशीर्वाद यांचा मी ऋणी आहे. हे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.

भारतीय जनता पक्षाला कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत मोडून काढला, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले. लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांनी शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभारही मानले.

शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. नाशिकमधील विजयी उमेदवार राजाभाऊ वाजे आणि ईशान्य मुंबईतील संजय दिना पाटील यांचा त्यात समावेश होता. असंख्य शिवसैनिकांसह वाजतगाजत ते ‘मातोश्री’वर पोहोचले होते. शिवसेनेच्या जयघोषाने यावेळी परिसर दुमदुमला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी विजयी उमेदवार आणि शिवसैनिकांशी संवाद साधला. शिवसेनेला मिळालेले यश हे शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आहे, मी निमित्तमात्र आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. सर्वांना मनापासून धन्यवाद देतानाच ते म्हणाले की, लढाईला आता सुरुवात झाली आहे. ही आपली पहिली लढाई होती. शिवसैनिकांची अफाट मेहनत आणि आशीर्वाद यांचा मी ऋणी आहे. हे प्रेsम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. या प्रेमाला आणि आशीर्वादाला मी दगा देणार नाही, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. यावेळी हे यश तुमच्या नेतृत्वामुळेच शक्य झाल्याचे सांगत शिवसैनिकांनीही उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिला.

जनतेला धन्यवाद देण्यासाठी राज्यभर फिरणार

शिवसेनेला विजय मिळवून देणारे शिवसैनिक आणि तमाम जनतेला धन्यवाद देण्यासाठी आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानत अभिनंदनही केले.