टी-20 वर्ल्ड कपचा थरार सुरू होत नाही तोच पावसाने खलनायकी अवतार दाखवून क्रिकेटप्रेमींची घोर निराशा करायला सुरुवात केलीय. सरावाचे काही सामने पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता मुख्य फेरीच्या सामन्यातही पाऊस फिल्डिंग करायला उतरला आहे. मंगळवारी इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात ब्रिजटाऊनमधला सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता, तर आता पाकिस्तान- अमेरिका सामनाही भिजण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. जर हा सामनाही रद्द करावा लागला तर वर्ल्ड कपच्या गुणतालिकेवर फार मोठा फरक पडू शकतो.
मंगळवारी इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसामुळे 10-10 षटकांचा करण्यात आला होता. स्कॉटलंडने दहा षटके फलंदाजी केल्यानंतर इंग्लंडला डकवर्थ-लुईस नियमानुसार 109 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांचा झंझावात पाहाताच आला नाही. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर पाऊस जाण्याच्या मूडमध्येच दिसत नसल्यामुळे पंचांनी सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण विभागून देण्यात आला. आता उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मंगळवारी कॅरेबियन बेटावर पावसाची झळ पोहोचली तर आता अमेरिकेच्या डल्लासलाही तीच स्थिती आहे. पावसाचा व्यत्यय असाच सुरू राहिला तर या प्रकारामुळे कुणाचेही भाग्य फळफळू शकते. रद्द सामन्यामुळे दिला जाणारा एक-एक गुण स्पर्धेच्या थरारात विरजण घालू शकतो.