कोऱया पाटीवर विजयाचा शेरा मिळणार; वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयासाठी पीएनजी आणि युगांडा भिडणार

पापुआ न्यू गिनी (पीएनजी) आणि युगांडा हे दोन्ही संघ आपापले सलामीचे सामने हरलेत. दुसऱयांदा टी-20 वर्ल्ड कप खेळत असलेल्या पीएनजीला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही आणि वर्ल्ड कप पदार्पण करणारा युगांडाही विजयाच्या प्रतीक्षेत आहे. उद्या होणाऱया सामन्यात कोऱया पाटीवर विजयाचा शेरा मिळवण्याची दोन्ही संघांना समान संधी आहे. कोणता संघ आपला पहिला-वहिला विजय मिळवण्यात यशस्वी ठरतो ते उद्याच कळू शकेल.

पीएनजी 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वप्रथम खेळला होता. त्या स्पर्धेत साखळीतील चारही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच या स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातही ते हरले. म्हणजेच वर्ल्ड कपमध्ये ते सलग पाच सामने हरलेत. दुसरीकडे युगांडाला अफगाणिस्तानविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे उद्या हे दोन्ही कमकुवत संघ एकमेकांशी भिडणार असून दोघांनाही आपला पहिला विजय नोंदविण्याची संधी चालून आली आहे. उभय संघांमध्ये पीएनजीचा खेळ काहीसा उजवा असल्यामुळे लिंबूटिंबूच्या या लढाईत युगांडाच्या पराभवाची शक्यता अधिक आहे. उभय संघांमध्ये आतापर्यंत एकच टी-20 सामना झाला असून यातही पीएनजीने बाजी मारली आहे. त्यामुळे पीएनजीने सलग पाच पराभवांनंतर पहिला विजय नोंदविला तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.