गेली 11 वर्षे अधुरे असलेले जगज्जेतेपदाचे मिशन घेऊन मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानने दुबळय़ा आयर्लंडचा आठ विकेटस् आणि 46 चेंडू राखून पराभव करीत प्रचंड विजयारंभ केला. आता हिंदुस्थानचे क्रिकेटयुद्ध येत्या रविवारी याच मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगेल.
लिंबू-टिंबू संघाचा मोठय़ा प्रमाणात सहभाग असलेल्या टी-20 वर्ल्डच्या साखळी लढती एकतर्फी होणार हे आधीच निश्चित होते. पाकिस्तानला नमवणाऱया आयर्लंडकडून हिंदुस्थानला कडवे आव्हान मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. हिंदुस्थानच्या जसप्रीत बुमरा, हार्दिक पंडय़ा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह यांच्या माऱयापुढे आयर्लंडचा संघ शंभरीसुद्धा गाठू शकला नाही आणि हिंदुस्थानसमोर 97 धावांचं माफक लक्ष्य उरलं. हिंदुस्थानने रोहित शर्माच्या 52 धावांच्या घणाघाताच्या जोरावर आयर्लंडच्या पराभवावर 13 व्या षटकातच शिक्कामोर्तब केले. कर्णधार रोहित शर्माने 4 षटकार आणि 3 चौकारांची आतषबाजी करत 37 चेंडूंत 52 धावा ठोकल्या आणि तो जखमी निवृत्त झाला. मग तब्बत 18 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱया ऋषभ पंतने 36 धावांची नाबाद खेळी करत हिंदुस्थानला मोठा विजय मिळवून दिला.
वेगवान माऱयापुढे आयर्लंड जमीनदोस्त
त्याआधी आयर्लंडने आपली सुरुवात चाचपडतच केली. पहिल्या दोन षटकांत केवळ 7 धावा झाल्या होत्या आणि मग सामन्याच्या तिसऱयार षटकात अर्शदीप सिंगने पॉल स्टार्ंलग (2) आणि ऍण्डी बालबर्णीला (5) धक्का देत सनसनाटी सुरुवात केली, पण त्यानंतर आयर्लंडच्या घसरगुंडीला कुणीच रोखू शकला नाही. हार्दिक पंडय़ानेही आपल्या लौकिकास साजेसा मारा करत 27 धावांत 3 तर बुमरा आणि सिराजने चार विकेटस् घेत आयर्लंडला शंभरीही ओलांडू दिली नाही. आयर्लंडने आपल्या 8 विकेटस् पन्नाशीतच गमावल्या होत्या, पण गॅरेथ डेलनीने 14 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकार खेचत संघाला शंभरीजवळ नेले. बुमराने 6 धावांत 2 महत्त्वाच्या विकेट टिपल्या. त्याची हीच कामगिरी हिंदुस्थानला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरली.
विराटचा प्रयोग फसला
सलामीला कुणाला खेळवायचे हा संघव्यवस्थापनासमोर मोठा प्रश्न होता. आज हिंदुस्थानने आयर्लंडसमोर विराट कोहलीला सलामीला खेळवण्याचा प्रयोग केला, पण तो फसला. कोहली पाच चेंडूंत अवघी एक धाव करून बाद झाला. कोहलीचा प्रयोग फसला असला तरी ऋषभ पंतला तिसऱया स्थानावर खेळविण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. शर्मा-पंतने 54 धावांची भागी देत हिंदुस्थानचा सहजसुंदर विजय पक्का केला.