अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात चार लाख जागा

अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात 3 लाख 99 हजार 235 जागा उपलब्ध आहेत. यापैकी ऑनलाइन प्रवेशासाठी दोन लाख 47 हजार 500 जागा उपलब्ध असतील.

मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे, रायगड, पालघर या जिह्यातील कनिष्ठ महाविद्यालये येतात. या महाविद्यालयांत या प्रवेशासाठी 3 लाख 99 हजार 235 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी इनहाऊस कोटय़ासाठी 26 हजार 213, अल्पसंख्याक कोटय़ासाठी 1 लाख 955, व्यवस्थापन कोटय़ासाठी 18,567 अशा एकूण एक लाख 45 हजार 735 जागा आहेत. तर उर्वरित 2 लाख 47 हजार 500 जागा या पेंद्रीय ऑनलाईन प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहेत.

अकरावी प्रवेशासाठी 5 ते 16 जून या कालावधीदरम्यान भाग-2 भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असून पहिली गुणवत्ता यादी 26 जून रोजी सकाळी 10 वाजता जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे.

 अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी सर्वाधिक जागा वाणिज्य शाखेच्या असून यामध्ये 1 लाख 25 हजार 921 जागा आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेच्या 83 हजार 608 जागा तर कला शाखेसाठी 34 हजार 689 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर एचएसव्हीसीसाठी केवळ 3 हजार 282 जागा उपलब्ध आहेत.