आगामी काळात बॉलिवूडमध्ये मराठी दिग्दर्शकांचा डंका वाजणार – आदित्य सरपोतदार

>> रश्मी पाटकर

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांचा डंका आधीच वाजत होता. पण येतं दशक हे मराठी दिग्दर्शकांचं असेल असा ठाम विश्वास निर्माता – दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केला आहे. उलाढाल, क्लासमेट्स, झोंबिवली, फास्टर फेणे अशा विविध आणि हिट चित्रपटांचं दिग्दर्शन आदित्य यांनी केलं आहे. त्यांच्या आगामी मुंज्या या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी सामना ऑनलाईनशी संवाद साधला.

मुंज्या या चित्रपटाविषयी बोलताना आदित्य म्हणाले की, मी मूळचा कोकणातला आहे. लहानपणापासून मी मुंज्या या भुताविषयी ऐकलं आहे. आपल्या मातीतले हॉररपट करण्याचा माझा मानस होताच. अनायासे मला जेव्हा निर्मात्यांकडून अशीच संहिता ऐकवण्यात आली, तेव्हा लगेच मी चित्रपट करण्यासाठी होकार दिला. मुंज्या कोण, भुताचा हा प्रकार कसा निर्माण झाला, याविषयी लोकांना माहीत नाही. त्यामुळे मला हा प्रकार सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा होता. म्हणून मी हा चित्रपट स्वीकारला, असं आदित्य सरपोतदार यावेळी म्हणाले. तसंच, आपल्या मातीतला विषय असलेल्या चकवा या विषयावरही आपल्याला भविष्यात चित्रपट बनवायला आवडतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक मराठी दिग्दर्शक आपल्या नावाचा डंका वाजवताना दिसत आहेत, याविषयी विचारलेल्या प्रश्नावर आदित्य सरपोतदार म्हणाले की, मराठी चित्रपट हे नेहमी दमदार संहितांवर चालले आहेत. आपल्या संहिता हेच खरे हिरो आहेत. त्यामुळे अशा संहिता हाताळणारे दिग्दर्शक आता बॉलिवूडमध्ये गाजताहेत. कारण, बॉलिवूडमध्येही आता दमदार संहितांचे चित्रपट चालताहेत. त्यामुळे मलाही आनंद होतोय कारण मुंज्याच्या निमित्ताने या सगळ्याचा मीही एक भाग होतोय. गेला काळ हा मराठी कलाकारांनी गाजवला पण बॉलिवूडमध्ये आगामी दशक हे मराठी दिग्दर्शकांचं असेल, असा ठाम विश्वास आदित्य सरपोतदार यांनी यावेळी व्यक्त केला.