Mehkar accident : छत्तीसगडहून पुण्याला निघालेली लक्झरी बस समृद्धी महामार्गावर पलटी; 56 प्रवाशांचा जीव टांगणीला

 

छत्तीसगडहून पुण्याला निघालेली लक्झरी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगांव गावानजीक हा अपघात झाला. या अपघातात 2 प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 5 च्या सुमारास छत्तीसगडहून पुण्याला निघालेली लक्झरी बस क्रमांक CG 09 JR 7002 डोणगांव येथे समृद्धी महामार्गावर (चॅनल क्रमांक 167) पलटी झाली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातात 2 प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमधून 56 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल पवन गाभणे, आनंद चोपडे, नितिन डूकरे व चव्हाण यांच्यासह महामार्ग पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. जखमी प्रवासी देवसिग धुर्वे व राजबब्बर (जि. कबीरधाम) यांना मेहकर येथे ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले व प्राथमिक उपचारानंतर बुलढाणा येथ रेफर केले.

अपघात घडताच मेहकर सह परिसरातील रूग्ण वाहिका मदतीसाठी घटनास्थळी आल्या. आरोग्य विभागाचे आपत्कालीन सहाय्यक संदीप पागोरे, प्रदीप पडघाण, दिगाबर शिंदे, डॉ. स्वप्निल सूसर, डॉ. गणेश शेळके, डॉ. वैभव बोराडे व इतर यांनी जखमींना जागेवरच सेवा दिली. बसमध्ये जवळपास 56 प्रवासी होते. त्यांच्यावर किरकोळ उपचार करुन त्यांना दुसर्‍या बसमध्ये बसवून पुढे रवाना करण्यात आले. पुढील तपास डोणगाव पोलीस ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत.