बारामतीकर शरद पवार यांच्याच पाठीशी, सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी जिंकल्या

संपूर्ण देशामध्ये लक्षवेधी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तब्बल 1 लाख 53 हजार मतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव केला. बारामतीची ही निवडणूक घासून होणार या चर्चेला बारामतीकरांनी सडेतोड उत्तर देत सुप्रिया सुळे यांना दणदणीत विजय मिळवून देत चौथ्यांदा लोकसभेत पाठवले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडून पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपबरोबर गेले. त्यानंतर बारामती मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. पवार कुटुंबियांमधीलच नणंद -भावजय यांच्यामध्ये झालेल्या या लढतीमुळे बारामती कुणाची या प्रश्नाचे देखील उत्तर निवडणुकीच्या निकालाने मिळाले आहे. एवढेच नव्हे तर बारामती तालुक्याने देखील सुप्रिया सुळे यांच्या पारडय़ात ज्यादा 48 हजार 98 मते टाकून संपूर्ण मतदारसंघात सर्वाधिक आघाडी देऊन बारामती कुणाची यावर देखील बारामतीकरांनी शिक्कामोर्तब केले. अटीतटीची होणार म्हणून गाजलेली ही निवडणूक सुप्रिया सुळे यांनी सहजपणे जिंकली. सुप्रिया सुळे यांनी एक फेरी वगळता सर्वच्या सर्व 23 फेऱयांमध्ये आघाडी मिळवली. सुप्रिया सुळे यांना 7 लाख 28 हजार 970 मते मिळाली तर सुनेत्रा पवार यांना 5 लाख 75 हजार 326 मते मिळाली. खडकवासला विधानसभा मतदारसंघ वगळता सुप्रिया सुळे यांनी इतर पाचही विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवले.