
दक्षिणेतील महत्त्वाचे राज्य असलेल्या तामिळनाडूत भाजपला खातेही उघडता आले नाही. सर्वच्या सर्व 39 जागांवर द्रमुक आणि काँग्रेस आघडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपची अण्णा द्रमुकबरोबर युती होती; पण येथे दोघेही साफ झाले.
द्रमुकला 29 तर काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई हे कोईम्बतूरमध्ये सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र त्यांचाही पराभव झाला. त्यामुळे भाजपला एकही जागा मिळाली नाही.
मोदींचे नऊ दौरे; ध्यानधारणा, मात्र जनतेने नाकारले
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी नऊ वेळा तामिळनाडूचा दौरा केला. 18वर मतदारसंघात सभा घेतल्या. कन्याकुमारी येथे ध्यानधारणा केली. मात्र तामिळनाडूच्या जनतेने मोदी आणि भाजपला नाकारल्याचे आज निकालावरून स्पष्ट झाले.
केरळात काँग्रेसचा मोठा विजय
केरळमध्ये काँग्रेस इंडिया आघाडीने मोठा विजय मिळविताना 20पैकी 18 जागा जिंकल्या आहेत. भाजपने पहिल्यांदा एक जागा जिंकून खाते उघडले आहे. लोकसभेच्या 20 जागांपैकी काँग्रेसला 14 जागा मिळाल्या. वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तिरुअनंतपुरम मतदारसंघात शशी थरूर तसऱयांदा विजयी झाले.
पंजाबमध्ये 26 वर्षांनंतर भाजपला भोपळा
पंजाबमध्ये 26 वर्षांनंतर भाजपला राज्यात एकही जागा मिळाली नाही. भाजपला भोपळाही पह्डता आलेला नाही. पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. 2014 आणि 2019ला भाजपने येथे मोठा विजय मिळविला होता. कारण त्या वेळी अकाली दलाबरोबर त्यांची युती होती.
तेलंगणात फिफ्टी-फिफ्टी
तेलंगणातील 17 जागांपैकी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी आठ जागांवर विजय मिळविला आहे. हैदराबाद मतदारसंघात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी सलग चार वेळा निवडून आले आहेत. धक्कादायक म्हणजे विधानसभा निवडणुकीप्रमाणे याही वेळी बीआरएसचा दारुण पराभव झाला असून एकही जागा मिळाली नाही.
उत्तर प्रदेशात बसपाला उतरती कळा
संपूर्ण देशभरात उमेदवार उभे करणाऱया काही मोजक्या राष्ट्रीय पक्षांपैकी एक असलेल्या बसपाला उत्तर प्रदेशातच मतदारांनी नाकारले आहे. बसपाप्रमुख मायावतींवरील मतदारांची माया मावळली असल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एकेकाळी मुख्यमंत्री असलेल्या मायावती सत्ता आणि जनतेपासूनही दुरावल्या आहेत. यंदा बसपाने संपूर्ण देशभरात 424 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी उत्तर प्रदेशमध्ये बसपाने सर्वच्या सर्व म्हणजे 80 जागा लढवल्या होत्या. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये एक जागाही जिंकता आलेली नाही. त्यामुळे मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीचे भवितव्य काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.