लोकशाही आणि संविधानाच्या मुळावर उठलेल्या हुकूमशहाचे अखेर गर्वहरण झाले आहे. ‘निकल गयी सब हेकडी इनकी…’ असाच दट्टय़ा जनतेने दिला आहे. ‘मन की बात’च्या मनमानीवर ‘जन की बात’ भारी पडली असून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणासह दक्षिणेत मतदारांनी भाजपला सपशेल झिडकारले आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाने राजकारण करणाऱया नरेंद्र मोदी आणि भाजपला अद्दल घडली. अयोध्यानगरीत भाजपचा दारुण पराभव झाला. लोकसभेच्या निकालात इंडिया आघाडीने 234 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड यश मिळवत काँग्रेसने 99 जागी विजय मिळवला. त्याच वेळी ‘अब की बार 400 पार’च्या गमजा मारणारे 241 वरच अडकले आणि कमळाबाईचा स्वप्नभंग झाला आहे. एनडीएला 291 जागांसह काठावरचे बहुमत मिळाले असताना भाजपच्या मित्रपक्षांत चलबिचल सुरू झाली असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार इंडिया आघाडीच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्या इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
दिल्लीत आज इंडियाची महत्त्वपूर्ण बैठक
निकालांनंतर दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी होत आहेत. भाजपला सत्तेपासून रोखता येईल का याची चाचपणी इंडिया आघाडीकडून सुरू आहे. त्यादृष्टीने उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीला देशात मिळालेले घवघवीत यश आणि पुढील व्यूहरचनेबाबत विचारमंथन केले जाणार आहे.
बजरंग बलीही पावले नाहीत; अमरावतीत नवनीत राणा पडल्या
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उडी मारून तिकीट मिळवणाऱया नवनीत राणा यांचा अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी 19 हजार 731 मतांनी पराभव केला. बजरंग बलीच्या नावाने राणा यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना जनतेने धडा शिकवला.