टी-20 वर्ल्ड कपच्या कार्यक्रमात काही संघांना आरामदायक प्रवास आणि काहींना प्रत्येक सामन्याला प्रवास दिल्यामुळे श्रीलंकन संघाने आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. लांबच्या आणि दीर्घ प्रवासामुळे आम्हाला आमचा एक सराव सामनाही रद्द करावा लागल्याने त्यांचा राग अनावर झाला असून त्यांनी या कार्यक्रमाची थेट आयसीसीकडे पत्र लिहून तक्रार केली आहे.
दीर्घ प्रवासामुळे थकलेल्या श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभवालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे श्रीलंकन खेळाडूंनी सामन्याच्या कार्यक्रमावर जोरदार टीका केली आणि अशा कार्यक्रमामुळे आमच्या संघावर फार वाईट परिणाम झाल्याचीही भावना व्यक्त केली. हे फार चुकीचे आहे की आम्हाला प्रत्येक सामन्यानंतर प्रवास करावा लागतोय. आम्ही आमचे चार सामने वेगवेगळय़ा मैदानांवर खेळणार आहोत. आम्ही फ्लोरिडा आणि मियामीवरून प्रवास करताना आठ-आठ तास विमानतळावर ताटकळत राहावे लागले होते. आम्हाला रात्री 8 वाजता निघायचे होते, परंतु आम्ही पहाटे 5 वाजता विमान पकडू शकलो. हे योग्य नाही, पण खेळताना या सर्व गोष्टींचा विचार करू शकत नसल्याचे संतप्त प्रतिक्रिया कर्णधार वाणिंदु हसरंगाने बोलून दाखवली.
महीश तीक्षणानेही आयसीसीच्या दुजाभावाबद्दल आपल्या भावना बोलून दाखवल्या. काही संघांना एकाच ठिकाणी खेळण्याचे भाग्य लाभतेय आणि त्यांचे हॉटेलही मैदानापासून अवघ्या 14 मिनिटांवर आहे. ते सरावाचे सामनेही येथेच खेळलेत आणि आम्हाला सराव सामन्यासाठी फ्लोरिडाला जावे लागले आणि तिसरा सामनाही आम्ही येथेच खेळणार आहोत. पुढच्या वेळी आम्हाला कार्यक्रमाबद्दल गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आता तर आम्ही काहीच करू शकत नसल्याचे उद्विग्नपणे तीक्षणा म्हणाला.
चार सामने चार ठिकाणी
गेले काही दिवस आमच्यासाठी खूपच कठीण गेलेत. चार सामने चार वेगवेगळय़ा ठिकाणी. हे खूप चुकीचे आहे आणि कठीणही. एक सामना न्यूयॉर्कला खेळल्यानंतर दुसरा सामना डल्लासमध्ये तिसरा फ्लोरिडाला, असे हसरंगा म्हणाला. एका अहवालानुसार श्रीलंकन संघाचे व्यवस्थापक महिंदा हालागोंडा यांनी याप्रकरणी आयसीसीला पत्र लिहिले आहे, मात्र स्पर्धेच्या मध्येच याप्रकरणी मार्ग काढणे कठीण असल्याची कल्पना श्रीलंकेला आहे.
काही संघ एकाच ठिकाणी खेळताहेत आणि श्रीलंकन संघ फिरतोय
श्रीलंकेच्या नाराजीनाटय़ानंतर काही संघांना सोयिस्कर पडेल असा कार्यक्रम आयसीसीने आखला असल्याचे निदर्शनास आले आहे. फ्लोरिडा येथे दक्षिण आफ्रिकन संघ दोन सामने खेळणार आहे तर हिंदुस्थानी संघ तीन-तीन सामने. श्रीलंकन कर्णधाराने हिंदुस्थानी संघाचे नाव न घेता आयसीसीने काही संघांना चांगला कार्यक्रम आखल्याची टीका केली. आमचे सामनेच दूर दूर नाहीत तर सरावाचे ठिकाणही हॉटेलपासून एक तास 40 मिनिटे दूर आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्हाला पहाटे 5 वाजता उठावे लागल्याचेही तो म्हणाला.