अत्यंत चुरशीने तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे एक लाख 53 हजार 309च्या मताधिक्याने निवडून आले. प्रतिस्पर्धी मिंधे गटाचे संजय मंडलिक यांच्याकडून दत्तक प्रकरणाचा जुना वाद नाहक उकरून बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात तळ ठोकून मंडलिक यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी याला सपशेल झिडकारून आपले मत आणि मानही शिवशाहूंच्या गादीला दिला. दरम्यान, कोल्हापुरात एकूण झालेल्या 31 फेऱयांमध्ये शाहू महाराज यांना सात लाख 50 हजार 323 मते, तर संजय मंडलिक यांना पाच लाख 97 हजार 14 मते मिळाली.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात 7 मे रोजी कोल्हापूर जिह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी 71.98 टक्के मतदान झाले. कोल्हापूरमध्ये 23, तर हातकणंगलेमध्ये 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
कोल्हापूरच्या मतमोजणीस सकाळी आठपासून रमणमळा परिसरात शासकीय गोदाम येथे सुरुवात झाली. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे सहा हजार 224 मताधिक्याने पुढे राहिले. एकूण 31 फेऱयांमध्ये शाहू महाराज हेच आघाडीवर कायम राहिले. संजय मंडलिक यांना त्यांच्या कागल, तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातून लाखांहून मताधिक्य मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र, मंत्री हसन मुश्रीफ, तसेच समरजीत घाटगे, आमदार राजेश पाटील यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला नसल्याचे सपशेल दिसून आले. एकमेव कागलमध्येच तेसुद्धा अवघे 14 हजार 426 एवढेच मताधिक्य मिळाले. कागल वगळता, चंदगड, करवीर, राधानगरी, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण या सर्वच विधानसभा मतदारसंघांत श्री शाहू महाराजांना मताधिक्य मिळाले आहे.
23 पैकी 21 जणांचे डिपॉझिट जप्त
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांपैकी तब्बल 21 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचे दिसून आले.
देशातील एकाधिकारशाहीला ‘स्पीडब्रेकर’ लागला!
आजच्या या निकालाने देशातील एकाधिकारशाहीला ‘स्पीडब्रेकर’ लागला आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कोल्हापूरच्या निकालानेही राज्याला आणि देशाला दिशा दाखवून देण्याचा प्रयत्न केला असून, स्थानिक, राज्य आणि केंद्रीय पातळीवर जनतेच्या नागरी समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपल्या विजयासाठी कष्ट घेतलेले दिवंगत आमदार पी. एन. पाटील, तसेच कोल्हापूरच्या जनतेला हा विजय समर्पित करीत असल्याचेही शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले.
शाहू महाराजांना विधानसभानिहाय मिळालेले मताधिक्य
करवीर – 71 हजार 803, राधानगरी – 65 हजार 522, कोल्हापूर उत्तर – 13 हजार 808, कोल्हापूर दक्षिण – 6 हजार 579, चंदगड – 9 हजार 475, तर एकमेव कागलमध्ये 14 हजार 426 मते कमी झाली.