मराठवाड्यात भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेचे तीन शिलेदार विजयी

सर्व आठ जागा जिंकण्याच्या वल्गना करणार्‍या भाजपचे नाकच मराठवाड्याने कापले. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे तसेच विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, सुधाकर शृंगारे यांचा दारुण पराभव झाला. शिवसेनेचे संजय जाधव, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी विजयाचा गुलाल उधळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मिंधे गटाचे संदिपान भुमरे यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव केला.

मराठवाड्यातील आठ जागांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. परभणीत शिवसेनेचे संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना जबरदस्त धोबीपछाड दिली. येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीसांच्या हट्टाखातर जानकरांना संधी देण्यात आली. मात्र सुरुवातीपासूनच संजय जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित समजला जात होता. संजय जाधव यांनी जवळपास दीड लाखांच्या फरकाने जानकर यांचा पराभव केला.

धाराशिवमध्ये पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मुसंडी मारली होती. येथे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना ऐनवेळी अजित पवारांच्या गटात प्रवेश देण्यात येऊन उमेदवारी देण्यात आली. राजेनिंबाळकर यांना 7,28,419 एवढी विक्रमी मते मिळाली तर अर्चना पाटील यांना 4 लाख मतांवर समाधान मानावे लागले. सव्वातीन लाखांच्या विक्रमी फरकाने राजेनिंबाळकर यांचा दणदणीत विजय झाला.

हिंगोलीत शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांनी दीड लाखांच्या फरकाने जोरदार विजय मिळवला. येथे मिंधे गटाचे हेमंत पाटील यांना भाजपने विरोध करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यास भाग पाडले. त्यानंतर येथे बाबुराव कदम कोहाळीकर यांना मिंध्यांनी उमेदवारी दिली. आष्टीकर यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यांना जवळपास पावणेपाच लाख मते मिळाली तर कोहाळीकर यांचा वारू पावणेचार लाखांवरच थांबला. एक लाखांच्या फरकाने आष्टीकर यांनी विजय मिळवला. येथे वंचितचे बी. डी. चव्हाण यांनी लाखभर मते घेतली.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचा सव्वालाख मतांनी मिंधे गटाचे संदिपान भुमरे यांनी पराभव केला. जलील यांच्या पराभवाने मराठवाड्यातून एमआयएमचे उच्चाटन झाले आहे. येथे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना 2 लाख 79 हजार मते मिळाले.

जालना मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी भाजपची 30 वर्षांची सरंजामशाही मोडीत काढली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सुरुवातीपासूनच प्रचारात मागे पडले होते. डॉ. काळे हे 22 व्या फेरीअखेर 5,22,596 मते घेऊन आघाडीवर होते. तर दानवे यांना 4,39,956 मते मिळाली. अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी 1,31,967 मते घेतली. काळे यांना 82,640 मतांची आघाडी मिळाली.

लातूर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांचा 67 हजार मतांनी पराभव केला. डॉ. काळगे यांना पावणेचार लाख तर शृंगारे यांना सव्वापाच लाख मते मिळाली. बीड मतदारसंघात अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत झाली. प्रत्येक फेरीने मतदारांची उत्कंठा वाढवली. पहिल्या फेरीपासूनच येथे भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात अटीतटीची स्पर्धा होती. शेवटच्या दोन फेर्‍यांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली. पंकजा मुंडे यांनी मिळवलेली आघाडी सोनवणे यांनी कापत 400 वर आणली. शेवटच्या सहा गावांच्या मोजणीने सोनवणे यांना विजयाची माळ घातली. परंतु पंकजा मुंडे यांनी फेरमोजणीची मागणी केली. सोनवणे हे तीन हजारांच्या फरकाने निवडून आले.

मोदींच्या वांझोट्या सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यात लातूर, नांदेड, परभणी, धाराशिवात सभा घेतल्या. पण या ठिकाणी मतदारांनी महायुतीला साफ झिडकारले. लातूरात सुधाकर शृंगारे, धाराशिवमध्ये अर्चना पाटील, परभणीत महादेव जानकर, नांदेडात प्रताप पाटील चिखलीकर यांना मत म्हणजे मोदीला मत असे आवाहन करूनही मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.