>> अभय यावलकर
आज समृद्धीच्या जोरावर आपण कार, बंगला घेतोय. पण सौर उपकरणांसाठी अनुदानाची वाट पाहतोय. किती हा विरोधाभास. पूर्वी ज्यांची परिस्थिती नाही त्याला अनुदान मिळायला हवे असे आपण म्हणत होतो. खऱ्या अर्थाने एखादा बदल स्वीकारण्याची ताकद सर्वांना मिळाली अर्थात मानसिकता बदलली तर निश्चितच विकसित तंत्रज्ञान पर्यावरणास पूरक ठरणार आहे. सौरऊर्जाचा वापर फक्त ऊर्जासाधन म्हणून नसणार आहे तर पर्यावरण संरक्षक म्हणून काम करेल. अर्थातच यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊन सजीवसृष्टीला दिलासा मिळणार आहे.
पृथ्वीवरील जमीन, पिण्यास योग्य पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यामुळे आज अस्तित्वात असलेली सजीवसृष्टी टिकून आहे. वातावरणातील हे घटक सर्व सजीवांसाठी महत्त्वाचे आहेत. जर कोणत्याही एका घटकाला धक्का पोहोचला तर त्याचा परिणाम सर्व घटकांवर होणार आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस, वादळ याचे प्रमाण वाढले. ही परिस्थिती बदलायची झाल्यास सौरऊर्जेसारखा नैसर्गिक स्रोत वापरून पर्यावरण संतुलित करण्यास मदत होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सूर्याकडून मिळणाऱया उष्णता आणि प्रकाश ऊर्जेचा उपयोग ठिकठिकाणी होऊ लागला आहे. सौरऊर्जाचा वापर फक्त ऊर्जासाधन म्हणून नसणार आहे तर पर्यावरण संरक्षक म्हणून काम करेल. अर्थातच यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होऊन सजीवसृष्टीला दिलासा मिळणार आहे.
1960 ते 70च्या दशकांत सौरऊर्जेचा उपयोग इंधनासाठी आणि वीज निर्मितीसाठी होऊ शकतो ही संकल्पना पेरण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो कमी पडला. त्या काळात गरजेनुसार अणुऊर्जेला प्रोत्साहन दिले गेले. आज तेही महत्त्वाचे ठरले. कालानुरूप नवनवीन ऊर्जास्रोतांचा शोध लागत राहिला तरी मात्र सौरऊर्जेसारखा ऊर्जा स्रोत शास्वत असणार आहे. सौरऊर्जा म्हणजे सर्वसामान्यांना वापरता येण्याजोगी, स्वच्छ, मुबलक आणि मोफत मिळणारी ऊर्जा असे गणित आहे. ते पर्यावरणास पुरकही ठरत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर सौरऊर्जेच्या वापरावर लक्ष पेंद्रित केले गेले आहे. गेल्या वर्षीच्या जी-20 परिषदेमध्ये अनेक राष्ट्रांनी सौरऊर्जा वापरासोबत तंत्रज्ञान देवाणघेवाण करार केलेले आहेत. हे करार सर्वांच्या हिताचे असून भविष्यकाळ हा शून्य कार्बन उत्सर्जनाचा असेल असा एक मार्गदर्शक नकाशाही तयार केला गेला आहे.
आज अन्नधान्य निर्मिती तसेच अन्न शिजवण्यापासून ते अवकाशात उपग्रहांना वीज पुरवण्यापर्यंतचा सौर ऊर्जेचा प्रवास सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा आहे. वनस्पतींना सूर्यप्रकाश मिळाला तरच प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करून अन्नधान्य तयार करू शकतात. माउंट अबू, तिरुपती बालाजी, शिर्डी संस्थान या ठिकाणी हजारो भाविकांचा स्वयंपाक आज सौरऊर्जेवर होत आहे. अर्थातच अन्न शिजवण्याच्या या प्रक्रियेकरिता या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे इंधन वापरले जात होते. शिवाय अब्जावधी टन कार्बन उत्सर्जन होऊन प्रदूषणाला हातभार लागत होता. प्रत्येक राज्याला वीजपुरवठा करणाऱया वीजनिर्मिती पेंद्रांमध्ये दरदिवशी लाखो टन कोळसा जाळला जातोय. तरीही पुरेशी वीज आम्हाला मिळत नाहीए. शिवाय या औष्णिक वीज पेंद्रांमुळे प्रदूषण पातळी मर्यादा ओलांडताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर येणाऱया सूर्यप्रकाशालाही राखेच्या धुलिकणांमुळे अडथळा निर्माण होउैन वनस्पतींना धक्का पोहचत आहे. जसा वनस्पतींचा श्वास कोंडला जातोय तसाच मानवाचा. ऑक्सिजन मिळताना नाकातोंडाद्वारे अनेक कण जात असल्याने फुफ्फुसाचे विकार होताना दिसत आहेत. अब्जावधी टन कार्बन उत्सर्जन पर्यावरणाला म्हणजेच संपूर्ण जैविक साखळीला घातक ठरत असल्याने पवन ऊर्जा, जलविद्युत, बायोगॅस प्रकल्प आणि सौरऊर्जा प्रकल्पाना शासकीय पातळीवर प्रोत्साहन दिले जात आहे.
प्रगतशील सौर तंत्रज्ञान
तीन दशकांपूर्वी सौरऊर्जेवरील उपकरण वापरणं परवडणारं नव्हतं. पण अनेक पर्यावरणप्रेमी सोलर कुकरचा वापर आपल्या घरी करताना दिसत असत. मात्र सौर वीज निर्मिती करणारे सोलर पॅनल श्रीमंत पण पर्यावरणाची जाण असलेल्या शिक्षित कुटुंबाकडे बघावयास मिळत असत. अर्थातच त्या वेळी एक व्हॅटसाठी सुमारे 400 रुपये मोजावे लागत होते. आज वापर वाढल्यामुळे ते 10 पटीने कमी झाले आहे. इतके स्वस्त, स्वच्छ, वापरण्यास सुलभ, बिना अपघाती आणि मुबलक तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
आता तंत्रज्ञान पूर्णपणे प्रदूषण विरहित कसे असेल यावर भर दिला जात आहे. एक व्हॅट यंत्रणा तयार करताना 5 ते 10 ग्राम प्रदूषण होत होते. परंतु आज तेही पूर्णपणे बंद कसे होईल यावर प्रयत्न सुरू आहेत. तंत्रज्ञ नवीन संशोधनाकडे वाटचाल करत असून उपलब्ध सेलच्या पलीकडे जाऊन आता सेंद्रीय आणि कार्बोनिक पदार्थ वापरून सेल तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यालाही काहीसे यश मिळाले आहे. या तंत्रज्ञानाला पेरोव्स्काईट्स म्हणूनही ओळखले जाते. अर्थात हे तंत्रज्ञान स्वस्त, अधिक कार्यक्षम आणि जास्तीत जास्त उत्पादित कसे करता येईल यावर पुढील संशोधनाचे लक्ष आहे.
आजमितीला ऑन ग्रीड आणि ऑफ ग्रीड असे दोन प्रकारे वीज वापर सुरू आहे. ऑन ग्रीड म्हणजे आपण सौर ऊर्जेमार्फत तयार केलेली वीज , वीज पंपनीला देणे आणि महिनाअखेरीस त्याचा ताळेबंद करून बिल घेणे. अर्थात हे बिल शून्य अथवा वापर जास्त असल्यास त्याप्रमाणे बिल येऊ शकते. तर ऑफ ग्रीडमध्ये तुम्ही स्वतः निर्माण केलेली वीज स्वतःच वापरायची असते. त्यात कोणतेही वीज बिल अथवा वीज कंपनीचा संबंध आपल्याशी राहत नाही. यासाठी आज मोनोक्रिस्टलाईन सेल आपण वापरत आहोत. भारतीय तापनामनाला आणि उत्तम सूर्यप्रकाशात या सेलची कार्यक्षमता (22-25%)उत्तम मिळत आहे. मोनोक्रिस्टलाईन सेलसोबतच पॉलीक्रिस्टलाईन आणि एमोरफस सेल उपलब्ध आहेत. पॉलीक्रिस्टलाईन सेल स्वस्त असले तरी कार्यक्षमता (12-17%)कमी असल्याने थोडे महाग परंतु दीर्घकाळ चालणारे आणि उत्तम कार्यक्षमता देणारे सेल वापरणे ग्राहकाच्या हिताचे आहे.
आज समृद्धीच्या जोरावर आपण कार, बंगला घेतोय. पण सौर उपकरणांसाठी अनुदानाची वाट पाहतोय. किती हा विरोधाभास. पूर्वी ज्यांची परिस्थिती नाही त्याला अनुदान मिळायला हवे असे आपण म्हणत होतो. खऱया अर्थाने एखादा बदल स्वीकारण्याची ताकद सर्वांना मिळाली अर्थात मानसिकता बदलली तर निश्चितच विकसित तंत्रज्ञान पर्यावरणास पूरक ठरणार आहे.
(लेखक विज्ञान आणि सौरऊर्जा अभ्यासक आहेत.)