मशालीने आग लावली आहे, आता यांना असली आणि नकलीचा फरक कळेल; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी शिवसेनेला नकली बोलणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार घणाघात केला. ”राज्यात आता मशालने आग लावली आहे. आता यांना असली आणि नकलीचा फरक कळेल. मला नकली संतान बोलतात. ते आपल्या आईला मानायला तयार नाही. मला परमात्माने पाठवले बोलतात”, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

लोकसभा निवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रीया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”आपल्या देशात सर्व सामान्य माणसांनी त्यांची ताकद काय असते ते दाखवून दिले आहे. सत्ताधारी किती मस्तवाल झाले तरी एका बोटाने आपण त्यांना रोखू शकतो. त्यांचा उधळलेला वारू रोखू शकतो हे देशातील जनतेने साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे”

माझा पक्ष फोडला. माझं चिन्ह घेतला. एकेकाळी बोलले जायचे की मोदीजींचा फोटो लावून आम्ही मतं मिळवली पण मोदीजींना माझ्या वडिलांचा फोटो लावून मतं मागावी लागली. सगळं हिसकावून घेऊनही मी उभा आहे. मला शिव्या दिल्या, टीका झाली माझ्यावर. मी कधी स्वत:ला परमात्माचा अवतार मानले नाही. जे माझ्यासोबत उभे राहिले त्यांचे आशिर्वादच माझी शक्ती आहे. मशालीने आग लावली आहे. आता यांना असली आणि नकलीचा फरक कळेल. मला नकली संतान बोलतात. ते आपल्या आईला मानायला तयार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.