भाजपला अहंकारी नेतृत्व भोवले, जनमताचा कौल हा नरेंद्र मोदी यांचा पराभव; मल्लिकार्जुन खरगे यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत जनतेचा कौल स्पष्ट झाला असून काँग्रेस आणि इंडिया आघाडीने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले आहेत. तसेत जनतेचा कौल हा नरेंद्र मोदी याचा पराभव असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकांचा निकाल म्हणजे जनतेचा, लोकशाहीचा विजय आहे. ही लढाई मोदी विरोधी जनता अशी होती. त्यात जनतेचा विजय झाला आहे. भाजपने एक व्यक्ती, एक चेहरा यांच्या नावावर मते मागितली. जनतेने दिलेला हा जनमत आम्ही स्वीकार करत आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. जनतेने सत्ताधारी भाजपविरोधात मतदान केले आहे. जनमत मोदी यांच्या विरोधात गेल्याने हा त्यांचा पराभव आहे. जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. जनमत स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांविरोधात आहे, असेही मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढवली आहे. तपास यंत्रणाचा दबाव, बँक खाते बंद करणे यासारखे प्रकार त्यांनी केले. मात्र, आम्ही जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला अपप्रचार जनतेच्या लक्षात राहील. त्यांनी विकासावर काहीही न बोलता जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले आहे.

काँग्रेसला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फायदा झाला. जनतेच्या समस्या सोडवण्याला आम्ही प्राधन्य दिले. त्याआधारे आम्ही जाहीरनामा तयार केला होता. त्यावरही मोदी यांनी चुकीचा प्रचार करत अफवा पसरवला. भाजप नेतृत्वाच्या अहंकारी वृत्तीमुळे त्यांचा पराभव झाला आहे. भाजपने संवैधानिक संस्थावर बेकायदेशीरपणे कब्जा केला. तसेच तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधकांवर दबाव टाकला. दबावाला बळी पडले त्यांना पक्षात घेतले तसेच ज्यांनी दबावाला जुमानले नाही, त्यांचा पक्ष फोडण्यात आला. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले.

या सर्व घटनांमुळे मोदी यांना पुन्हा एक संधी दिली तर ते पुढचा हल्ला संविधानावर करतील, हे जनतेला समजून चुकले. जनतेने दिलेल्या जनमतामुळे भाजपचा हा डाव आता यशस्वी होणार नाही. काँग्रेसला मजबूत स्थितीत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच इंडिया आघाडीची एकजूटही या निकालातून दिसून आली आहे. आता आपल्याला देशाच्या संविधानासाठी, लोकशाही रक्षणासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी आणखी लढावे लागणार आहे. त्यासाठी आगामी काळ महत्त्वाचा असणार आहे.