राज्यातील विधानसभेचे चित्र बदलणार…! शरद पवारांचा शंखनाद

महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलेल्या कणखर पाठिंब्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुकही त्यांनी केले. राज्यातील निकाल परिवर्तनाला पोषक आहे. जनतेने जाती-धर्माच्या पलीकडे जात रोजगार-महागाईच्या मुद्द्यावर कौल दिला आहे. लोकशाही मूल्यांच्या रक्षणाच्या भूमिकेला जनतेने पाठिंबा दिला आहे. देशाचे चित्र बदलण्यात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सुदैवाने देशपाळीवरील चित्रही चांगले आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनेही चांगला कौल दिला आहे. या राज्यात भाजपला जास्त जागा मिळत होत्या. मात्र, आता जनतेने त्यांना नाकारले आहे. ज्या काही जागा त्यांनी जिंकल्या आहेत, त्या थोड्याफार फरकाने जिंकल्या आहेत. आम्ही राष्ट्रपातळीवर एकत्रितपणे केलेल्या कामाचे हे फलित आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्राने परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. बारामती मतदारसंघातील जनता योग्य निर्णय घेईल ,याची खात्री होती, असेही त्यांनी सांगितले.

आमच्या पक्षाने 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी आम्ही 7 जागांवर आघाडीवर आहोत. त्यामुळे आमचा स्ट्राईकिंग रेट चांगला आहे. हे यश फक्त आमच्या पक्षाचे आहे असे नाही, तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकजुटीने केलेल्या कामाचे हे फलित आहे, असेही पवार यांनी सांगितले. आता यापुढेही आम्ही एकत्रित काम करणार असून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार आहोत. उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आता राज्यातील विधानसभेचे चित्र बदलण्यासाठी हा निर्णय पोषक आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील कोणताही पक्ष वेगळा निर्णय घेणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आपण चंद्राबाबू नायडू यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली असे वृत्त पसरवले जात आहे, मात्र, त्यात तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि मित्रपक्षांशी चर्चा करून आता पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. आपण सहकारी पक्षांशी चर्चा केली असून इंडिया आघाडीची बुधवारी दिल्लीत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सर्व पक्ष चर्चेतून पुढील रणनीती ठरवणार आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.