लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी शेअर बाजार धडाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 4300 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1300 अंकांनी आणि बँक निफ्टी 4000 हून अधिक अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेअर बाजाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भविष्यवाणीही खोटी ठरली.
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल आल्यानंतर शेअर बाजार सर्व विक्रम मोडत शिखरावर पोहोचले असे म्हटले होते. मात्र मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारने लाल बत्ती पेटवली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळत नाही असा कल येताच बाजार सेन्सेक्स 6000 अंकांनी, तर निफ्टी 2000 आणि बँक निफ्टी 4500 अंकांनी घसरला. कोविड महामारीनंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण पहायला मिळाली. अर्थात दुपारनंतर मार्केट थोडे रिकव्हर झाले, मात्र गुंतवणूकदारांचे या घसरणीमुळे प्रचंड नुकसान झाले.
छोटे गुंतवणूकदार डब्यात
‘400 पार’चा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 जून रोजी कशाच्या आधारे बाजार शिखरावर पोहोचेल असे विधान केले हा सवाल आता उपस्थित होत आहे. पंतप्रधानांच्या या भविष्यवाणीमुळे छोट्या गुंतवणूकदारांनी बाजारात मोठा पैसा लावला होता. एक्झिट पोलमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दाखवण्यात आले. यामुळे बाजारात तेजी आली, मात्र मतमोजणी सुरू होताच इंडिया आघाडीने एनडीएला 300च्या आत रोखले. त्यामुळे बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि बाजार कोसळला.
शहांचं भाकित
दरम्यान, फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एका मुलाखतीत शेअर बाजाराबाबत भाकित केले होते. 4 जून 2024 रोजी शेअर बाजारात तेजी येईल असे ते म्हणाले होते. एक्झिट पोलमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे दाखवण्यात आले. त्यामुळे बाजार दोन दिवस ऑल टाईम हायला गेला. परंतु मतमोजणीच्या दिवशी मात्र मोदी-शहांचे भाकित खोटं ठरलं आणि बाजारात घसरण झाली.