लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू होऊन चार तास उलटले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंतचे कल पाहता देशात इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली असून सत्ताधारी भाजपली धडकी भरली आहे. विशेष करून महाराष्ट्र आणि यूपीचे कल पाहता भाजपची दाणादाण उडाली आहे. प्रभू रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपला राम पावला नाही. जनतेचा आशीर्वाद ‘इंडिया’ आघाडीला मिळताना दिसतोय.
देशातील सध्याची मतांची मोजणी पाहता भाजपप्रणित एनडीए २९० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीने मुसंडी घेतली असून २३५ जागांवर आघाडी घेतली आहे. यामुळे ‘इंडिया’ आघाडीने भाजपची घोडदौडीला लगाम घातला आहे. निवडणूक आयोगाच्या दुपारी १२ वाजेपर्यंतच्या आकडेवारून राजकीय पक्षांचे कल आपण पाहूया…
दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप २३० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ९५ जागांवर आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने यावेळी कमाल केली आहे. समाजवादी पार्टीचे ३७ उमेदवार यावेळी आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे ३३ उमेदवार आघाडीवर आहेत. त्यानंतर तामिळनाडूत डीएमकेनेही भाजपला धक्का दिला आहे. डीएमके २१ जागांवर आघाडीवर आहे.
#ElectionResults निकाल लागायचा तो लागेल, पण… संजय राऊतांचं मोठं विधान
महाराष्ट्रात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १० उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ८ उमेदवार आणि काँग्रेसचे ९ उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे २७ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे गेल्या निनडणुकीत एकट्याने २३ जागा जिंकणाऱ्या भाजपचा या निवडणुकीत महाराष्ट्रात बाजार उठला आहे.
हरयाणात काँग्रेसचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये विधानसभेत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत मात्र धक्का बसला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे.