लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. हुकूमशाहीविरुद्ध देशातील कोटय़वधी लोकांनी दिलेला कौल उघडला जाईल. खटाखट खटाखट निकाल बाहेर येतील आणि लोकशाहीचा विजय होईल. संपूर्ण देश त्या विजयाची प्रतीक्षा करत जल्लोषासाठी सज्ज झाला आहे. देशातच नव्हे तर जगभरात उद्याच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. पंधराव्या मिनिटाला पहिला कल येणार असून दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मतमोजणी संदर्भात माहिती दिली. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून दबाव आणल्याच्या मुद्दय़ावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सारवासारव केली. अफवा पसरवणे, एखाद्यावर संशय घेणे योग्य नाही इतकेच उत्तर देत त्यांनी बगल दिली.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला होता. त्याचा तपशील निवडणूक आयोगाने आज सायंकाळी सात वाजेपर्यंत मागितला होता. दरम्यान, उत्तर देण्यासाठी रमेश यांनी एका आठवडय़ाची मुदत मागितली, मात्र आयोगाने त्यांची विनंती फेटाळळी आहे.
सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. त्यासाठी 10 लाख 50 बुथ सज्ज ठेवण्यात आले आहेत. 8 हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात असून त्यांचे पोलिंग एजंटही मतमोजणी केंद्रांवर असणार आहेत. सर्व ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असेल, असे आयुक्तांनी सांगितले.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय 14 टेबलांवर मतमोजणी होईल. म्हणजे प्रत्येक लोकसभेत एकूण 84 टेबलांवर मतमोजणी होईल. यामध्ये साधारणतः 50 ते 75 हजार मतांची मोजणी केली जाईल. यामुळे पहिल्या पंधरा मिनिटांत निवडणूक निकालाचा कल स्पष्ट होणार आहे.
सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी
सर्वात आधी पोस्टल बॅलेटमधील मतांची मोजणी सुरू होईल. त्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने नियमाप्रमाणे सर्वात आधी पोस्टल बॅलेटमधील मतांची मोजणी करण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयुक्तांकडे केली होती त्यानुसार आधी या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. एक गाइडलाइन आणून आयोगाने नियम बदलला होता. इंडिया आघाडीने त्यावर आक्षेप घेतला होता.
पराभूत उमेदवाराला ईव्हीएम मशीनमधील मायक्रो चिप तपासण्याचे अधिकार मिळाले आहेत. निकालात शंका असल्यास मतदारसंघातील 5 टक्के ईव्हीएमच्या मायक्रो चिप तपासता येतील. त्यासाठी प्रत्येक ईव्हीएममागे 40 हजार रुपये शुल्क भरावे लागेल.
मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत आणि पोलिंग प्रतिनिधींना व्हिडीयोग्राफी करण्याचीही परवानगी दिली जाईल, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सुमारे एक लाख ते सवा लाख कर्मचारी, पोलीस, विविध सरकारी यंत्रणांच्या मदतीने 48 मतदारसंघांतील मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मतमोजणी केंद्राच्या तीनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यात मतमोजणीसाठी 289 हॉलमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय 14 ते 27 पर्यंत टेबल मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण 4 हजार 309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
वेट ऍण्ड वॉच
लोकसभा निवडणुकीचे जे एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्याच्या उलट निवडणुकीचे निकाल असतील, असा विश्वास काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. वाट पाहायला हवी, जस्ट वेट ऍण्ड वॉच असेही त्या म्हणाल्या. प्रसिद्ध करण्यात आलेले एक्झिट पोल निराधार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हेराफेरी होऊ शकते…मतमोजणी वेळी सतर्क राहा
मतमोजणी वेळी हेराफेरीची शक्यता लक्षात घेता सर्व मतमोजणी प्रतिनिधींनी सतर्क राहावे, असे आवाहन इंडिया आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे. ईव्हीएम मशीनचा नंबर बरोबर जुळतो का हे तपासायला सांगा. त्या कंट्रोल युनिटमध्ये किती मते पडली याचा डेटा सर्वांकडे उपलब्ध आहे. मतांच्या संख्येत थोडी जरी तफावत दिसली तरी तत्काळ आक्षेप नोंदवून संबंधित मशीनमधील मतदान नव्याने मोजण्यास सांगा. मशीनमध्ये पडलेल्या मतांमध्ये नंतर वाढ कशी झाली, याचा जाब विचारा. त्याचे लेखी उत्तर संबंधित मतमोजणी अधिकाऱ्यांकडून घ्या, अशी सूचनाही इंडिया आघाडीने केली आहे. काहीतरी गोलमाल सुरू असल्याची शंका आल्यास आघाडीच्या वरिष्ठ पधिकाऱ्यांशी संपर्क साधा, असे नमूद करतानाच मतमोजणी प्रतिनिधींसोबतच सर्वांनीच उद्या सतर्क राहायचे आहे, असे आवाहनही करण्यात आले आहे.