देशात लोकशाही नांदणार की हुकूमशाही येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अठराव्या लोकसभेसाठी तब्बल दीड महिना आणि सात टप्प्यात घेण्यात आलेल्या निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होणार आहे. मराठवाड्याच्या आठही मतदारसंघात मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली असून मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोजणी सुरू झाल्यानंतर साधारण तासाभरात कल हाती येण्याची शक्यता आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात पाचशे कर्मचारी मतमोजणीचे काम करणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय 96 टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणी एकूण 26 फेर्यांमध्ये होणार आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात सहाशे कर्मचारी मतमोजणी करणार असून मतदारसंघनिहाय 94 टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणी 25 फेर्यांमध्ये होईल.
बीड लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी तब्बल दोन हजार कर्मचारी नेमण्यात आले असून 89 टेबलवर ही मोजणी होणार आहे. 32 फेर्यांमध्ये ही मतमोजणी होईल.
लातूर लोकसभा मतदारसंघात 28 फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी हजारभर कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली असून 94 टेबल लावण्यात आले आहेत.
धाराशिव मतदारसंघात मतमोजणीसाठी दीड हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 98 टेबल लावण्यात आले आहेत. मोजणी एकूण 83 फेर्यांमध्ये होईल.
परभणी मतदारसंघात मतमोजणीसाठी हजार कर्मचारी नेमण्यात आले असून 84 टेबल लावण्यात आले आहेत. एकुण 31 फेर्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे.
जालना मतदारसंघात तेराशे कर्मचारी मतमोजणीचे काम करणार असून 84 टेबलवर ही मोजणी 26 फेर्यांमध्ये होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात मतमोजणीसाठी पाचशेच्या वर कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 84 टेबलवर 27 फेर्यांमध्ये ही मोजणी होणार आहे.