मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंगळवार, 4 जूनपासून आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होणार होते. मात्र आचारसंहिता असल्यामुळे पोलीस प्रशासनाने या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आपले नियोजित उपोषण स्थगित केले असून आता ते 8 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत.
मराठा आरक्षण, सगेसोयर्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 4 जूनपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. आंतरवाली सराटीत उपोषणाची तयारीही करण्यात आली. मात्र या उपोषणाला काही गावकर्यांनी विरोध केला. गावातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा बिघडण्याची भीती असल्यामुळे या उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारपासून सुरू होणार्या उपोषणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू आहे. आचारसंहितेच्या काळात उपोषण करता येणार नाही, असे कारण देत पोलीस प्रशासनाने या उपोषणाला परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्याचे पत्र पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी स्वत: मनोज जरांगे यांना आंतरवालीत नेऊन दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी स्वत: उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. हे उपोषण आता 8 जून रोजी सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.