महाविकास आघाडीला 32 जागा मिळतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

‘लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून, आता 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. 2004मध्ये पुन्हा वाजपेयी सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती; पण त्याच्या उलटे झाले होते. आताच्या निकालाबाबत सांगायचे तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 32 जागा मिळतील,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच ‘माध्यमांकडून जो एक्झिट पोल दिला जातो, त्यातून केवळ त्यांचा ‘टीआरपी’ वाढविण्यावर भर असतो. यातून फक्त लोकांची करमणूक होते. यामुळे एक्झिट पोलवर विश्वासार्हता राहत नाही,’ असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथे दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीनंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक पार पडली. यात महाविकास आघाडीला साधारणतः 32 जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.