एक्झिट पोल हा धंदा आहे, पैसे मिळतात तसे आकडे फिरवतात – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या एक्झिट पोलवर टीका केली आहे. एक्झिट पोल हा धंदा आहे, पैसा फेको तमाशा देखो, पैसे मिळतात तसे आकडे फिरवतात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. एक्झिट पोल काही फुकट काम करत नाही, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे आहे त्यांचे, असे म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला.

भाजपला देशात बहुमत मिळेल अशी अनेक एक्झिट पोलची आकडेवारी सांगते. त्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा एक्झिट पोल आहे. ओपिनियन पोल व एक्झिट पोल हे कसे चुकीचे ठरतात हे बघत आलो आहोत. एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानात लोकसभेच्या 26 जागा आहेत आणि एका एक्झिट पोल कंपनीने भाजपला तिथे 33 जागा दाखवल्या, अशी पोलखोलही संजय राऊत यांनी केली.

– अधिकाऱ्यांना धमक्या देऊन, ध्यान तपस्या करून निवडणूका जिंकता येत नाहीत, असा हल्लाबोल भाजपवर करतानाच ‘इंडिया’ आघाडी देशात सरकार बनवणारच, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ‘इंडिया’ आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा मिळवेल. तीस तर नक्कीच जिंकू, असे ते म्हणाले.

सुप्रिया सुळे दीड लाख मतांनी जिंकतील

z महाराष्ट्रातील जनतेचा कल सॅम्पल सर्व्हे घेऊन कळत नाही, असे सांगतानाच, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे किमान दीड लाख मतांनी जिंकतील, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहील आणि काँग्रेसचा बेस्ट परफॉर्मन्स राहील. महाराष्ट्रासह कर्नाटक, बिहार, हरयाणा आणि दिल्ली ही राज्ये देशात परिवर्तन घडवतील, असे संजय राऊत म्हणाले.

ध्यानमग्न मोदींना 800 जागा मिळायलाच हव्यात

एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, एक्झिट पोल कंपन्या भाजपला देशात 800 ते 900 जागाही देतील. नरेंद्र मोदी यांनी एवढे कॅमेरे लावून तपस्या केली. अशा ध्यानमग्न माणसाला 800 जागा मिळायलाच हव्यात. तरच ते ध्यान मार्गी लागेल, असा टोलाही संजय राऊत यांनी मोदींना लगावला.