भाजपने सातत्याने 400 पारचा नारा सुरू ठेवला आहे. पण त्यांना 350, 400 जागा दिल्या कुणी? मला तर आश्चर्य वाटतेय की, भाजपला केवळ 400 जागा कशा दिल्या गेल्या? अखंड हिंदुस्थानात त्यांच्या 700 जागा निवडून येऊ शकतात. पाकिस्तानातून शंभरेक जागा, नेपाळमधून 50, अफगाणिस्तानातून 50, बांगलादेशातून 50, 30-35 श्रीलंकेतून, 20-25 थायलंडमधून तर काही इंडोनेशियातून जिंकून येतील. एक्झिट पोलची चेष्टा लावलीय काय? एकतर तुम्ही खूप मोठा फेरफार केला आहे आणि तो लपवण्यासाठीच असे एक्झिट पोल दिलेत, अशा शब्दांत ‘आप’ने भाजपवर खोचक टीका केली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे एक्झिट पोल भाजपच्या कार्यालयात तयार करण्यात आले आहेत. सर्व वाहिन्यांवरचे आकडे जवळपास सारखेच आहेत. कुणाला विश्वास बसेल की, भाजपाला तामीळनाडूत 34 टक्के मते मिळणार आहेत? कुणाला विश्वास बसेल की आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये 0 ते 2 जागा मिळतील? तुम्ही असे आकडे देत आहात ज्यावर लोक हसत आहेत, असा टोला संजय सिंह एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला.
सगळीकडे महागाई, बेरोजगारीबाबत नाराजी
सर्व एक्झिट पोलवाल्यांना जनतेच्या मताची अजिबात माहिती नाही. तुम्ही कुठेही जा, लोकांमध्ये महागाई, बेरोजगारीबाबत नाराजी आहे, परंतु तुमचे आकडे सांगत आहेत की, भाजपा चहुबाजूंनी जिंकत आहे, हे कसे शक्य आहे? असा प्रश्न सिंह यांनी उपस्थित केला. तसेच ‘इंडिया’ आघाडीच्या वेगवेगळय़ा पक्षांनी जो सर्व्हे केला त्यानुसार ‘इंडिया’ आघाडीला देशभरात 295 हून अधिक जागा मिळतील, असेही संजय सिंह म्हणाले.