पॅनकार्ड अपडेटच्या नावाखाली महिलेची फसवणूकप्रकरणी एकाला पायधुनी पोलिसांनी बिहार येथून अटक केली. निरंजन कुमार तरणी मंडल असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार महिला या पायधुनी येथे राहतात. त्या दिव्यांग मुलांसाठी थेरेपी सेंटर चालवतात. मार्च महिन्यात त्यांना एका नंबरवरून पह्न आला. त्याने तुमचे बँकेचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले असल्याचे भासवले. त्यासाठी पॅनकार्ड अपडेट करावे लागेल अशा भूलथापा मारल्या. त्या मेसेजखाली एक लिंक होती. त्या लिंकवर त्याने क्लिक केले. त्यावर त्याने त्याची वैयक्तिक माहिती भरली. माहिती भरल्यावर त्यांना चार ओटीपी आले. त्यानंतर त्यांना पुन्हा पॅनकार्ड अपडेटसाठी मेसेज आला त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. काही वेळाने त्यांना पुन्हा एकाचा पह्न आला. त्याने तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले.
तुमचे केवायसी अपडेट झाले नाही. त्यासाठी मेसेजमध्ये एक लिंक पाठवत आहे. त्या लिंकवर माहिती भरण्यास सांगितली. माहिती भरल्यानंतर रात्री त्यांना मोबाईलवर 4 लाख 90 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक बिहार येथे गेले. बिहार येथून पोलिसांनी निरंजन कुमारला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणले.