विजय हेच एकमेव लक्ष्य; ओमान-नामिबिया आज आमने सामने

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघांना स्थान देण्यात आले असले तरी सुपर-एटमध्ये कोणता संघ पोहोचेल, याचे अनुमान साऱयांनीच लावले आहेत. तसेच ‘ब’ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या आजीमाजी जगज्जेत्यांना सुपर-एटमध्ये आधीच सर्वांनी स्थान दिलेय. त्यामुळे नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान या संघांनी एकमेकांविरुद्ध विजय मिळवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. परिणामतः ओमान आणि नामिबिया या संघांनी एकमेकांना हरवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे ब्रिजटाऊनवर कुणाचा झेंडा फडकवतो, याची उभय संघांच्या चाहत्यांना उत्सुकता लागलीय.

ओमान आणि नामिबिया हे दोन्ही संघ एकाच ताकदीचे असले तरी कागदावर नामिबियाच सरस आहे. दोघांमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले असून नामिबियाने चार सामने जिंकलेत. विशेष म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार अष्टपैलू आहेत. नामिबियाचे नेतृत्व गेरहार्ड इरासमस करतोय तर ओमानचे कर्णधारपद आकिब इलियासकडे सोपविण्यात आलेय. विजयाची सलामी देणाऱया संघाला सुपर-एटचे स्वप्न पडू शकतात. कारण एखादा सनसनाटी विजय या तीनपैकी एका संघाला सुपर-एटमध्ये पोहोचवू शकतो. उम्मीद पर दुनिया कायम है. मग या बेभरवशाच्या खेळात एक विजय त्यांची आशेची ज्योत धगधगत ठेवेल.