सिक्कीममध्ये पुन्हा ‘क्रांती’ अरुणाचलात भाजपला बहुमत

सिक्कीम विधानसभा निवडणुकीत  एसकेएम अर्थात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हा पक्षच पुन्हा सत्तेत आला असून या पक्षाने भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. सिक्कीम विधानसभेच्या 32 पैकी 31 जागांवर एसकेएमने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय मिळवला असून भाजपला खातेही उघडता आले नाही. दरम्यान, अरुणाचल प्रदेशात 60 पैकी 46 जागा जिंकत भाजप पुन्हा सत्तेत आला आहे.

काँग्रेस आणि सिटीजन अॅक्शन पार्टी-सिक्कीमला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. एसकेएमच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि आपल्या सरकारवर असलेला लोकांचा प्रचंड विश्वास यामुळेच पक्षाने जोमदार विजय मिळवला. विजयाचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाते, अशा भावना सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे प्रमुख प्रेम सिंह तमांग यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांचे अभिनंदन केले आहे.

बायच्युंग भूतिया पराभूत

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायच्युंग भूतियाला राजकीय मैदानात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. भूतिया बारफुंग विधानसभा मतदारसंघातून एसडीएफच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे उमेदवार रिक्शल दोरजी भूतिया यांनी बायच्युंग भूतियावर 4,346 मतांनी मात केली.

अरुणाचलमध्ये अजित पवार गटाचे तीन उमेदवार विजयी

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटून स्वतंत्र गट स्थापन केलेल्या अजित पवार गटाला अरूणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. अजित पवार गटाचे तीन उमेदवार तिथे निवडून आले आहेत. निकील कामीन, लिखा सोनी आणि टोकू टाटम अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.

अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजपने विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 60 पैकी 46 जागा भाजपने जिंकल्या. येथे 10 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे 50 जागांवर निवडणूक झाली. भाजप आणि नॅशनल पीपल्स पार्टीची युती असून एनपीपीला 5 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला येथे 1 जागा मिळाली आहे.