लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा; घरावरील, शाळेवरील पत्रे उडाले

लातूर जिल्ह्यातील काही भागात रविवारी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. अनेक घरावरील पत्रे उडाले तर एका शाळेतील पत्रेही उडून गेले. वीजेचे खांब, झाडे उन्मळून पडली. वीज पडून एक म्हैस दगावली आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये मागील दोन महिन्यापासून अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. रविवारी दुपारी जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे वीज पडून म्हैस दगावली आहे. चिलवंतवाडी येथील शाळेवरील पत्रे उडून गेले आहेत. औराद शहाजनी परिसरातही अवकाळी पाऊस झाला. अहमदपूर शहर आणि तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. लातूर शहरात सायंकाळच्या सुमारास थोडासा पाऊस झाला.

उदगीर तालुक्यातील गुडसूर येथे दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. अनेक घरावरील पत्र उडून गेले. अनेक शेतकऱ्यांचे शेतातील शेड उडून गेले आहेत . शेडमध्ये ठेवलेल्या ज्वारीचे, गव्हाचे, सोयाबीनचे भिजून मोठे नुकसान झाले आहे.