लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजाभाऊ वाजे उमेदवार होते. एक्झिट पोलच्या अंदाजनुसार राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे पिछाडीवर आहेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मतमोजणीसाठी नेमणूक केलेल्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. त्यात या प्रतिवनिधींना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रतिनिधींना महत्त्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 1 हजार 910 बूथ आहेत. बॅलेट युनिट आणि कंट्रोलिंग युनिट महत्वाचे आहे. सर्व बूथची आम्ही माहिती गोळा केली आहे आणि तिथे किती मतदान झाले. ही आकडेवारी आमच्याकडे आहे. बूथ प्रतिनिधींनी सर्व काउंटिंग नंबर चेक करून मतदान मोजणी सुरू करावी. बॅलेट आणि कंट्रोलिंग युनिटचा स्टार्टिंग टाईम आणि मतदान मोजणी बंद झाले त्यावर लक्ष ठेवावे. बॅटरी किती चार्जिंग आहे त्यावर देखील लक्ष ठेवायचे आहे. रिझल्टचा टाइमिंग देखील तेथे बघून निर्णय घ्यायचा आणि नंतर मतमोजणी सुरू करायची, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सुधाकर बडगुजर म्हणाले की, मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे. निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधींकडून चुकीचे काम झाले नाही पाहिजे त्यासाठी ही बैठक घेतली आहे. मतमोजणीत पारदर्शकता असायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. काही ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी बदलली जाते, काही ठिकाणी रिझल्ट बदलले जातात त्यावर आमचे लक्ष असणार आहे. बूथनिहाय लिस्ट आहे त्यावरून आकडे आणि मशीन मधील आकडे एकत्रित करूनच मतमोजणी सुरू करावी, अशा सूचना दिल्या आहेत. चार जूनला निकालाची प्रतीक्षा करा, घोडा मैदान लांब नाही, असे त्यांनी म्हटले.