लोकसभा निवडणुकीसाठीचे देशातील सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या एक्झिट पोलनंतर महाराष्ट्रात भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. राज्यात 45 प्लसची घोषणा करून विजयासाठी केविलवाणा प्रयत्न केले. मात्र, एक्झिट पोलमध्ये राज्यात भाजपला धक्का बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निकाल भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात जाण्याचा अंदाज आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी होण्याची शक्यता जनळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तविली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार निराश असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपुरातून निवडणूक लढवण्यासाठी मी तयारच नव्हतो. पक्षाचा आदेश आला म्हणून तयार झालो. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा क्षेत्र येतात. या दोन विधानसभा क्षेत्रात माझा फारसा जनसंपर्क नव्हता. तरीही मी लोकसभेची निवडणूक लढविली. मी आधीपासूनच ठरवले होते, विजयी झाले तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर खचायचे नाही, त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेतून त्यांची निराशा दिसून येत आहे.
जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीत उभा असून जनतेला वाटलं की, त्यांचे प्रश्न काँग्रेसचा उमेदवार चांगल्याने सोडवू शकतो, तर ते काँग्रेसला निवडून देतील. जनतेने मला संधी दिली तर मी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी जिवापाड काम करेन. मात्र, जनतेने संधी दिली नाही तर जनतेला मलाच निवडून द्या, अशी बळजबरी मी करू शकत नाही. मी चंद्रपूरबद्दल साशंक नाही. मात्र, निर्णय जनतेला घ्यायचा आहे हे विसरून चालणार नाही. पराभव झाला तर मी पूर्ण शक्तीने माझ्या क्षेत्रात कामासाठी लागेन, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
बहुतांश एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला राज्या 15 ते 20 जागांचा फटका बसण्याचा अंदाज आहे.