नांदेड – पावडेवाडी येथे झुडुपामध्ये सापडले 426 काडतूस, एटीएसचे पथक दाखल

नांदेड पोलिसांनी शनिवारी रात्री भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झुडपामध्ये 426 राऊंड्स (काडतूस) जप्त करण्यात आले असून, आज सकाळी बीडीडीएस व एटीएसचे पथक दाखल झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पावडेवाडी शिवारातील राहणारा आकाश रामराव पावडे हा नाल्यामधील झाडाझुडपामध्ये झाडावर असलेले मध काढण्यासाठी गेला होता. त्या नाल्यामध्ये त्याला हे काडतूस दिसले. त्याने दिलेल्या माहिती नंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांचे पथक घटनास्थळी पोहचले असता पावडेवाडी शिवारातील या नाल्यामध्ये 426 राऊंड (काडतूस) नाल्याच्या मातीमध्ये अर्धवट उघडे पडलेले दिसून आले.

त्यातील काही राऊंड गंजून जिर्ण झालेल्या अवस्थेत दिसून आले. सदरचे राऊंड (काडतूस) पोलिसांनी ताब्यात घेतले असून, राऊंडवर पाठीमागील फायर कॅपवर 7.62, ओएफव्ही-78-एम-80 असे कोरुन लिहिले आहे. पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील जुन्या अंमलदाराच्या मार्फत याची कसून तपासणी केल्यानंतर सदरील राऊंड हे 1978 मध्ये म्हणजे 46 वर्षापूर्वी बनविले असून, ते गंजून जिर्ण होऊन निकामी झालेले आहेत, असे प्रथमदर्शनी अहवालात म्हटले आहे. असे असले तरी सदरचे राऊंड कुणी आणून फेकून दिले. त्यांचा वापर कशासाठी करण्यात आला, त्याचा नेमका काय हेतू होता याचा पोलीस तपास करीत आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणात जिर्ण झालेले हे राऊंड (काडतूस) मिळाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, रात्रीपासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार हे घटनास्थळी उपस्थित आहेत. दहशतवाद विरोधी पथक व बीडीडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सर्व बाजूनी या प्रकरणाचा गोपनियरित्या तपास सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा साठा सापडल्याने पोलीस सर्व बाजूनी तपास करत असून, नेमका याचा उद्देश काय, याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने देखील याची पाहणी करुन त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सध्या सुरु आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार सदरची काडतुसे ही लाईट मशिन गणमध्ये वापरली जातात. हे शस्त्र सध्या प्रतिबंधीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.