देशभरातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. या पोलनुसार देशात एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या एक्झिट पोलवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”एक्झिट पोल काही फुकट काम करत नाही. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असे आहे त्यांची. हा एक धंदा आहे. पैसा फेको तमाशा देखो. पैसा मिळतात तसे आकडे फिरवतात”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
”अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा एक्झिट पोल आहे. ओपिनिय व एक्झिट पोल हे कसे चुकीचे ठरतात हे बघत आलो आहोत. एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानात लोकसभेच्या 26 जागा आहेत आणि एका एक्झिट पोल कंपनीने भाजपला तिथे 33 जागा दाखवल्या. मला असं वाटतं की या सर्व कंपन्या मिळून भाजपला देशात 800 ते 900 जागा देतीलच. मोदी एवढे ध्यानाला बसले आहेत. एवढं ध्यान करत आहेत. एवढे कॅमेरे लावून त्यांनी साधना तपस्या केली. अशा ध्यानस्थ माणसाला 800 जागा तर मिळायलाच पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागेल असं मी म्हणेन, असा टोला संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
”भाजप व त्यांच्या यंत्रणा कशाप्रकारे सगळ्या गोष्टींवर प्रभाव टाकतात ते आपण बघत आलो आहोत. जयराम रमेश यांनी काल सांगितले की अमित शहा यांनी गेल्या 24 तासात देशभरातली 180 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले आहे. काय धमकावले असेल ते वेगळे सांगायला नको. अशा प्रकारे हे यंत्रणांवर दबाव आणतात. तुम्हाला जर जिंकण्याची खात्री आहे कशाला हवे हे दबावतंत्र. अशा धमक्या देऊन, ध्यान तपस्या करून निवडणूका जिंकता येत नाहीत. इंडिया आघाडी या देशात सरकार बनवणारच. 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे. आम्ही सरकार बनवत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 पेक्षा जास्त जागा मिळवेल. तीस तर नक्कीच जिंकू. या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे. हे सँम्पल सर्व्हे घेऊन कळत नाही. गेले काही दिवस ऐकत होतो बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असं बोलत होते. आम्ही सांगतो सुप्रिया सुळे किमान दीड लाख मतांनी जिंकतील. शिवसेनेचा अठऱाचा आकडा कायम राहील. काँग्रेसचा बेस्ट परफॉर्मन्स राहील. देशात महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, दिल्ली, हरयाणा ही राज्य देशात परिवर्तन घडवतील. आम्हाला सध्या लोकांचा कल काय आहे ते माहित आहे. त्यासाठी आम्हाला साधना, ध्यान करत, कॅमेरे लावून बसावं लागत नाही. आम्हाला माहित आहे काय निकाल लागणार आहे. आम्ही इथे गोट्या खेळायला बसलेलो नाही. आयुष्य आमचं राजकारणात समजाकारणात पत्रकारितेत गेलं आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे.
”एक्झिट पोल बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत . प्रत्येकाची स्पर्धा आहे. हे फुकट कोणी काही करत नाही. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, जो देईल पेजेला, त्याच्या शेजेला… अशा या कंपन्या आहेत. मोठे पक्ष या कंपन्यांना पैसे देतात व हवे तसे पोल घडवून आणतात. पैसा फेको तमाशा देखो. एक्झिट पोल धंदा आहे, पैसा देतात तसे आकडे फिरवतात”, असे संजय राऊत म्हणाले.