दिल्लीचे मुख्यमंत्री, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांना रविवारीच तिहार तुरुंगात जावे लागणार आहे. त्यांनी अंतरिम जामिनाची मुदत वाढवण्यासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी युक्तिवाद पूर्ण झाले. त्यानंतर न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आणि 5 जूनला जामीन मुदतवाढीबाबत निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.
कथित उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणात ईडीने 21 मार्चला केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र प्रचारादरम्यान त्यांना काही गंभीर आजाराची लक्षणे दिसली. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासण्यांसाठी अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची विनंती त्यांनी केली. त्यांच्या अर्जावर शनिवारी ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी आक्षेप घेतला. केजरीवाल यांच्यातर्फे अॅड. एन. हरिहरन यांनी जोरदार बाजू मांडली.
दोन्हीकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी जामीनाचा निर्णय 5 जूनला देणार असल्याचे स्पष्ट केले. तोपर्यंत तात्पुरता दिलासा नाकारल्यामुळे केजरीवाल यांना रविवारीच तिहार तुरुंगात जावे लागणार आहे.