सलमानवर हल्ल्याचा पुन्हा कट, बिष्णोई गँगच्या चौघांना अटक

सिनेअभिनेता सलमान खान याच्यावर हल्ला करण्याचा कट आखणाऱया बिष्णोई गँगच्या चार जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी सलमानवर हल्ला करण्यासाठी त्याच्या फार्महाऊसची आणि घराची रेकी केली होती. सलमानची गाडी अडवून पिंवा त्याच्या घरात घुसून गोळीबार करण्याचा प्लॅन त्यांनी आखला होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. सलमानच्या घरावर दोन शूटर्सनी गोळीबार केल्याचा प्रकार घडून दीड महिना उलटत नाही तोच हा कट समोर आल्यामुळे सलमानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगमधील काही गुंड सलमान खानवर हल्ल्याची तयारी करीत असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सलमानचा पनवेल येथील फार्महाऊस आणि वांदे येथील घरावर पाळत ठेवली. त्यावेळी काही जण तिथे रेकी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी धनंजयसिंह तपेसिंह उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हायी, वस्पी खान उर्फ वसीम चिकना आणि झिशान खान उर्फ जावेद खान यांच्या मुसक्या आवळल्या. हे आरोपी लॉरेन्स बिष्णोई, त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई यांच्या संपका&त होते. बिष्णोई बंधूंसह गोल्डी ब्रार यांनी सलमानच्या हत्येचा कट रचला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सलमान शूटिंग करत असलेल्या ठिकाणांसह त्याच्या फार्महाऊसचीही रेकी केली होती. त्यांनी सलमानवर घरात घुसून आणि गाडी अडवून हल्ला करण्याचा कट आखला होता. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. अन्य फरारी आरोपींचाही पोलीस कसून शोध घेत आहेत, असे परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

ही कारवाई पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, बजरंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गंथडे, यशवंत झाजम, नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, परेश म्हात्रे, अमोल पाटील, पोलीस नाईक संजय सावंत, विनोद देशमुख, रवींद्र पारधी, प्रसाद घरत, किरण कराड, साईनाथ मोकल, अभय मेऱया, विशाल दुधे, माधव शेवाळे, समाधान पाटील, महेश माने, वैभव शिंदे, प्रवीण पाटील यांनी केली.

पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्र
सलमान खानवर हल्ला करण्यासाठी बिष्णोई गँगच्या गुंडांनी फार्महाऊस आणि वांद्रे येथील घराचे चित्रीकरण केले होते. या हल्ल्यासाठी ते पाकिस्तानमधून एके-47, एम-16 आणि एके-92 ही अत्याधुनिक शस्त्र मागवणार होते. या शस्त्रांचा पुरवठादारही पाकिस्तानी आहे. या कटात सुमारे 31 जणांचा समावेश आहे. त्यापैकी चार जणांवर पोलिसांनी झडप घातली आहे, असेही पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी स्पष्ट केले.