अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 26 जूनला जाहीर होणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 16 जूनपर्यंत कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येतील. जास्तीत जास्त 10 कॉलेजांचे पर्याय नोंदविणे आवश्यक असेल. प्रवेश फेरीत मिळालेला प्रवेश रद्द करताना विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घेण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. संबंधित कॉलेजला विनंती करून विद्यार्थी आपला प्रवेश रद्द करू शकतात. मात्र अशा प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज पुढील एका फेरीसाठी बाद ठरविण्यात येणार आहेत.

कोणत्याही प्रवेशफेरीत पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट झाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश न घेतल्यास असा विद्यार्थीदेखील पुढील एका प्रवेशफेरीसाठी बाद होणार आहे. तसेच विद्यार्थ्याला अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्याने लॉगीनमध्ये जाऊन प्रोसिड फॉर अॅडमिशनवर (Proceed for Admission) क्लिक करावे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे वेळापत्रक
5 ते 16 जून
प्रवेशअर्जाचा भाग 2 भरणे (जास्तीत जास्त 10 कॉलेजांचे पर्याय देणे) कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन पसंती देणे, नवीन विद्यार्थी नोंदणीही करता येईल.
(15 जूनपर्यंत अर्जाचा भाग 1 भरणे)
18 जून प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर
18 ते 21 जून
गुणवत्ता यादीवर ऑनलाइन हरकती नोंदविता येणार (ग्रीव्हन्स टूलद्वारे) शिक्षण उपसंचालकांनी हरकतींचे निराकरण करणे (रात्री 10 पर्यंत)
22 ते 25 जून
पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे
26 जून
पहिली गुणवत्ता यादी जाहीर (सकाळी 10 वाजता)
26 ते 29 जून
प्रवेश निश्चिती, प्रवेश रद्द करणे, पुढील प्रवेशफेरीसाठी नवीन नोंदणी, अर्जाचा भाग 1 भरणे

29 जून
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तसेच व्यवस्थापन, इनहाऊस कोटय़ातील रिक्त जागा जाहीर करणे
1 जुलै
नियमित फेरी 2 साठी रिक्त जागा जाहीर करणे

18 जूनला कोटा प्रवेशाची शून्य फेरी
अल्पसंख्यांक, इनहाऊस आणि मॅनेजमेंट या कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. व्यवस्थापन कोटय़ातील प्रवेश हे कॉलेजस्तरावर होतील. 5 ते 16 जून या कालावधीत कोटय़ाद्वारे प्रवेशासाठी अर्ज करता येईल. 18 जूनला अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची शून्य फेरी गुणवत्ता यादी कॉलेजस्तरावर जाहीर होईल. यादरम्यान मॅनेजमेंट आणि इनहाऊस कोटय़ातील रिक्त जागा नियमित फेऱयांसाठी खुल्या होतील. 22 ते 25 जूनदरम्यान कोटानिहाय रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. 26 जूनला कोटी प्रवेशाची पहिली फेरी पार पडेल. 28 जूनपर्यंत प्रवेश घेता येईल. 1 जूनला कोटय़ातील रिक्त जागा जाहीर होतील.

प्रवेशफेऱयांचे संभाव्य वेळापत्रक
2 ते 8 जुलै
नियमित प्रवेश फेरी 2
9 ते 18 जुलै
नियमित प्रवेश फेरी 3
19 ते 26 जुलै
नियमित प्रवेश फेरी 4