लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात देशातील सात राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 60.37 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदान बिहारमध्ये झाले. मतदानाच्या काळात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाली.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्पात एकूण 904 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री अनुक्रमे आर. के. सिंह आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, तसेच अफजल अन्सारी, विक्रमादित्य सिंग हे नशीब अजमावत आहेत. बलिया येथे मतदानासाठी आलेल्या एका वृद्धाचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला. उष्णतेमुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
सातव्या टप्प्यातही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगालच्या भांगरमध्ये सीपीआय (एम) आणि आयएसएफ कार्यकर्त्यांनी टीएमसी समर्थकांवर बॉम्बहल्ला केल्याचा आरोप आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने ट्विट केले की जमावाने जयनगरमधील बेनिमाधवपूर शाळेजवळ सेक्टर ऑफिसरचे राखीव ईव्हीएम आणि कागदपत्रे लुटली. 1 सीयू, 1 बीयू, आणि 2 व्हीव्हीपॅट मशीन तलावात टाकण्यात आल्या.
95 महिला उमेदवार
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सातव्या टप्प्यात 904 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात 809 पुरुष उमेदवार तर 95 महिला उमेदवार रिंगणात आहेत.
व्हीव्हीपॅट तलावात
पश्चिम बंगालमधील बेनिमाधवपूर शाळेजवळ सेक्टर ऑफिसरचे राखीव ईव्हीएम आणि कागदपत्रे लुटली. एक सेंट्रल युनिट, दोन व्हीव्हीपॅट मशीन तलावात टाकण्यात आल्याची माहिती या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने ‘एक्स’द्वारे दिली आहे.
राज्य आणि मतदानाची टक्केवारी (संध्या. 5 पर्यंत)
बिहार – 48. 86 टक्के
चंदिगड – 62. 80 टक्के
हिमाचल प्रदेश – 66.56 टक्के
झारखंड – 67.95 टक्के
ओडिशा – 62.46 टक्के
उत्तर प्रदेश – 54 टक्के
पश्चिम बंगाल – 69. 89 टक्के