निकालाआधी व्यूहरचना; इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, अडीच तास चर्चा

इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला 23 पक्षांचे नेते उपस्थित होते. इंडिया आघाडी लोकसभेच्या किमान 295 जागा जिंकून मोठा विजय मिळवेल, असा विश्वास यावेळी सर्वच नेत्यांनी व्यक्त केला. जवळपास अडीच तास चाललेल्या बैठकीत 4 जून रोजी होणाऱया मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, कल्पना सोरेन, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, डीएमकेचे टी. आर. बालू, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान असल्याने तसेच वादळानंतरचे मदतकार्य सुरू असल्याने ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत.

बैठकीनंतर खरगे यांनी माध्यमांशी संवाद साधला व इंडिया आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आजच्या बैठकीत महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. निकालादिवशी काय रणनीती असली पाहिजे, यावर सर्व नेत्यांनी विचार व्यक्त केले, असे खरगे यांनी सांगितले.

लढाई अजून संपलेली नाही
लढाई असून संपलेली नाही. इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष, नेते, कार्यकर्ते सतर्क आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढली आहे त्यामुळे सकारात्मक निकालाबाबत आम्हाला खात्री आहे. देशातील जनता या निवडणुकीत आमच्यासोबत होती. यावेळी इंडिया आघाडीच जिंकणार, असे खरगे म्हणाले. इंडिया आघाडी एकजूट आहे आणि यापुढेही एकजूट राहणार, असेही खरगे यांनी ठामपणे सांगितले.

इंडियाचे शिष्टमंडळ आज निवडणूक आयुक्तांना भेटणार
मतदानानंतर आता मतमोजणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही सगळेच सतर्क झालो आहोत. आमच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या आहेत. इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. मतमोजणीत कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ असू नये यासाठी आवश्यक निर्देश सर्व संबंधित अधिकाऱयांना देण्यात यावेत, अशी विनंती आम्ही आयुक्तांकडे करणार आहोत, असे खरगे यांनी सांगितले. त्याबाबत आमच्या मागण्यांचे विस्तृत निवेदन आयोगाला दिले जाईल, असे खरगे म्हणाले.