मुंबईकरांचे जम्बो हाल! मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना फटका

प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामासाठी सलग दुसऱया दिवशी मध्य रेल्वेवर घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकमुळे शनिवारी मुंबई, ठाणेकरांचे चांगलेच हाल झाले. ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील लोकल वडाळय़ापर्यंत तर मुख्य मार्गावरील सर्व लोकल भायखळय़ापर्यंतच धावत असल्याने वडाळा, भायखळय़ापासून ते कुलाब्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली. एरव्ही चाकरमानी आणि प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या सीएसएमटी स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळाला.

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढविण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून 63 तासांचा, त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट 10 आणि 11 ची लांबी वाढविण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून 36 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला. मध्य रेल्वेवरील 37 मेल-एक्प्रेस शनिवारी रद्द करण्यात आल्या. तसेच 534 लोकल फेऱया रद्द करत रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाडय़ा चालविण्यात आल्यामुळे याचा फटका प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात बसला. बहुतेक सरकारी आणि खासगी कार्यालयांना शनिवारी सुट्टी असल्यामुळे तसेच काही आस्थापनांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा दिल्याने प्लॅटफॉर्मवर नोकरदारवर्गाची गर्दी कमी होती. कामानिमित्त ज्यांना नाइलाजाने रेल्वे प्रवास करण्याची वेळ आली त्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असल्याने लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळाली.

वेळापत्रक बघून आज घराबाहेर पडा…
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन असतील तर आधी रेल्वेचे वेळापत्रक बघा. ठाण्यात रविवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत तर सीएसएमटी येथे दुपारी 12.30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेवरील 235 लोकल फेऱया तर 31 मेल-एक्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक रद्द करण्यात आले आहेत.

‘बेस्ट’साठी लांबच लांब रांगा, प्रचंड गर्दी, उन्हाने घामटा; पुरेशा बस नसल्याने प्रवाशांत संताप
रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’वर प्रचंड ताण आला. रेल्वेच्या लाखो प्रवाशांनी सकाळपासूनच बस स्टॉपवर गर्दी केल्याने स्टॉपवर लांबच लांब रांगा लागल्या. मात्र ‘बेस्ट’कडून मुंबईत पुरेशा बस सोडल्या गेल्या नसल्याने प्रचंड उकाडय़ात प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेच्या मेगाब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी 55 जादा बसेस चालवण्यात आल्याचा दावा बेस्ट उपक्रमाने केला, मात्र प्रत्यक्षात अनेक बस थांब्यावर गाडय़ा वेळीच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गर्दी झाली.

रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनचालकांकडून लूट
प्रवाशांचे हाल होत असताना रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनचालकांनी मात्र जादा भाडे वसूल करून प्रवाशांची चांगलीच लूट केली. अनेक ठिकाणी नियमित भाडय़ाच्या दुप्पट ते तिप्पट भाडे आकारण्यात आले. आधीच रखडपट्टी झालेल्या प्रवाशांच्या संतापाचा भडका उडाला. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले.