ज्येष्ठ नागरिकाला वडिलोपार्जित घरी जाण्यास परवानगी, उच्च न्यायालयाचे आदेश

मरणशय्येवर असलेल्या पतीची वडिलोपार्जित घरी नातवाला भेटण्याची, घरातील मंदिरात असलेल्या देवतांची पूजा करण्याची शेवटची इच्छा असून ती मान्य करावी, अशी मागणी करणारी याचिका 76 वर्षींय महिलेने उच्च न्यायालयात केली होती. याचिकेची दखल घेऊन न्या. मिलिंद साठ्ये आणि न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने वृद्ध जोडप्याला त्यांच्या वडिलोपार्जित घराला भेट देण्याची आणि देवतांची पूजा करण्याची मागणी मान्य केली.

न्यायालयाने मागील सुनावणी दरम्यान, प्रतिवादी सुनेच्या वकीलांना न्यायालयाने विशिष्ट अटींनुसार याचिकाकर्त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित घरी जाण्याची आणि नातवाला भेटण्याची परवानगी देण्याबाबत योग्य तारीख सुचविण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार, याचिकाकर्त्याचे वाढते वय आणि त्यांच्या पतीच्या वैद्यकीय स्थितीमुळे, आपण ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे दाद मागणार नाही, असे प्रतिवादी सुनेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच संमती करार कऱण्यास तयार असल्याचेही न्यायालयाला सांगितले. करारातील अटींनुसार, 4 जून रोजी याचिकाकर्ती आजारी पती आणि एक वैद्यकीय कर्मचारी यांना घरातील गणेश मंदिरात जाण्याची परवानगी असेल आणि दुपारी एक वाजता घरातील गणपतीची पूजा करण्यासही अनुमती असल्याचे सुनेच्या वतीने न्यायालयाला सांगितले. त्यावेळी प्रतिवादी सुनेला घरातून बाहेर काढू नये, तीही घरातच उपस्थित राहिल, तसेच मंदिरातील पवित्र मूर्ती याचिकाकर्ते सोबत घेऊन जाणार नाहीत, असेही संमतीच्या करारावर नमूद केले आहे. त्याची दखल घेऊऩ न्यायालयाने करारातील सर्व अटींचे पालन करून याचिकाकर्त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित घराला भेट देण्याची आणि देवतांची पूजा करण्याची मागणा मान्य केली आणि याचिका निकाली काढली.

याचिकाकर्त्यांच्या मुलाचे 2010 मध्ये लग्न झाले. सुरुवातीला नवविवाहित दाम्पत्य वृद्ध जोडप्यासह पेण येथील वडिलोपार्जित घरी राहू लागले. काही काळानंतर कुटुंबात वाद निर्माण झाले आणि वाद इतका विकोपाला गेला की सुनेने वृद्ध जोडप्याला 2020 मध्ये घरातून बाहेर काढले. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याचा मुलगा, सून आणि त्यांचा 12 वर्षांचा नातू वडिलोपार्जित घरात राहत होते. तणावपूर्ण संबंध असूनही, वृद्ध जोडपे त्यांचा नातवाच्या जून 2023 पर्यंत संपर्कात होते. मात्र, सुनेने त्यांचे बोलणेही कथितरित्या बंद केले. ऑगस्ट 2023 मध्ये प्रकरणाला वेगळेच वळण लागले. जेव्हा, याचिकाकर्तींच्या पतीला कर्करोगाचे निदान झाले. व्यापक उपचार आणि शस्त्रक्रिया सहन केल्यानंतर, त्यांची प्रकृती बिघडली. मरणशय्येवर असलेल्या पतीने नातवाला भेटण्याचे आणि वडिलोपार्जित घराला भेट देऊन घरच्या मंदिरातील देवतांची पूजा करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांच्या सुनेने त्यांना घरात प्रवेश नाकारला. त्यानंतर वृद्ध जोडप्याने पेण पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतेही सहकार्य न मिळाल्यामुळे वृद्ध महिलेने अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली होती.