मासेमारीचा बंदीचा काळ सुरू; हर्णै बंदरातील नौकांच्या शाकारणीच्या कामास गती

शासनाने 1 जूनपासून 31 जुलै पर्यंतच्या कालावधीसाठी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि प्रभावी व्यवस्थापन तसेच सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मोटारीकृत आणि यांत्रिकी मासेमारी बोटींना मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हर्णै बंदरात मासेमारी करणाऱ्या मासेमारांनी आपआपल्या मासेमारी बोटी आंजर्ले अडखळ खाडीत आणून बोटींच्या शाकारणीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे एरव्ही मासेमारी बोटींनी गजबजलेले हर्णै बंदर सुनं सुनं वाटत आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अन्वये यावर्षी 1 जून 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 1 जून ते 31 जुलै या दरम्यानच्या कालावधीत मासळीच्या जीवाना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्याचप्रमाणे या कालावधीत खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे हर्णै बंदरात मासेमारी करणाऱ्या बहुतांश नौकांनी आंजर्ले अडखळ खाडीत ज्या ठिकाणी सुरक्षित जागा मिळेल त्या ठिकाणी आपल्या मासेमारी बोटी आणून ठेवल्या आहेत.

हर्णै बंदरात लहान मोठया साधारणपणे 1 हजार नोंदणीकृत मासेमारी बोटी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णै बंदर हे दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर असले तरी अजूनही हर्णै बंदरात मासेमारी बोटीं लावण्यासाठी जेटीची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे हर्णै बंदरातील बोटींना हर्णै बंदरापासूनच दुर आंजर्ले, अडखळ खाडीसह दाभोळ बंदरात बोटी सुरक्षित लावण्यासाठी घेऊन जावे लागते.

साधारणपणे 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. त्यामुळे बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या दरम्यानच्या कालावधीतील हवामान हे समुद्रात जाणे धोक्याचे असते. शासनाने धोक्याचा काळ निर्धारित केला असल्याने मासेमारांची जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास शासन नुकसान भरपाई देत नाही. त्यामुळे कुठल्याही यांत्रिक बोटींनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- दिप्ती साळवी, परवाना अधिकारी, दाभोळ