T20 World Cup 2024 : हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही, टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचं मोठ वक्तव्य

टी-20 वर्ल्ड कपचा थरार रविवारपासून (2 जून) सुरू होणार आहे. सर्व संघ कंबर कसून सराव करत आहेत. पण टीम इंडियाने अजूनही त्यांचे 11 शिलेदार निवडलेले नाहीत. सलामीला कोण खेळणार, मधल्या फळीत कोण खेळणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे अद्याप बाकी आहे. या सर्व घडामोडींवर टीम इंडियाचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडियाला अमेरिकेच्या धर्तीवर क्रिकेट खेळण्याचा अनुभव नाही. टीम इंडियाचा एकमेव सराव सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. त्यामुळे प्लेइंग-11 मध्ये कोणाला खेळवायचे हा मोठा प्रश्न कर्णधार रोहित शर्माच्या समोर असण्याची शक्यता आहे. सलामीला रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जयसवाल यांच्या नावांचा समावेश आहे. कोहली सलामीला येणार की तिसऱ्या नंबरला याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र विराटने आयपीएलमध्ये सलामीला येत तुफान फलंदाजी केली आहे. त्यामुळे विराट रोहितच्या जोडीला सलामीला येण्याची शक्यता जास्त आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यामध्ये कोणता खेळाडू कोणत्या जागेवर खेळणार याचे चित्र स्पष्ट होईल.

टीम इंडियाचे माजी सलामीवीर संजय मांजरेकर यांनी या सर्व घडामोडींवर हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रीया दिली आहे. “टीम इंडियाने चांगल्या फिरकीपटूंसह मैदानात उतरावे, कारण टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीमध्ये कमतरता दिसत आहे. मोहम्मद शमी असता तर चित्र वेगळे असते, परंतु त्याच्या दुखापतीमुळे संघ अडचणीत सापडला आहे,” अस म्हणत संजय मांजरेकर यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

संजय मांजरेकर यांनी यावेळी हार्दिक पंड्याने IPL 2024 मध्ये केलेल्या कामगिरीवर सुद्धा भाष्य केले. “हार्दिक पंड्या तुमचा पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही. त्याने फारशी गोलंदाजी केलेली नाही त्यामुळे हार्दिक टीम इंडियाचा सहावा गोलंदाज होऊ शकतो. त्याचा फिटनेस सुद्दा चांगला आहे, ” अस संजय मांजरेकर म्हणाले आहेत.