मेडिटेशन नव्हे, 27 कॅमेरे लावून मोदींचा उघड प्रचार; संजय राऊत यांनी डागली तोफ

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीच जिंकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भाजपसह सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. कन्याकुमारीत मोदी ड्रामा करत असून त्यांचा प्रचार सुरू आहे, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही. सत्य बोलल्याबद्दल या देशात एक तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं किंवा तुरुंगात पाठवलं जातं. पण 4 जूननंतर चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही, आम्हाला भीती नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

‘सामना’मध्ये मी जे लिहितो अग्रलेख असेल रोखठोक असेल त्यामागे सत्याचा आधार असतो. पाडापाडीचा खेळ महायुतीत झालेलाच आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची लढाई भारतीय जनता पक्षाबरोबरच होती. आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करतोय, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘खोके घेणारे लोक आम्हाला नोटीस पाठवताहेत?’

मजा आयेगा… जे सरकार संविधानाची पायमल्ली करून स्थापन झाले, असे घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीरपणे सत्ता मिळवली, जे सरकार भ्रष्टाचाराच्या दलदलीतून वर आलं आहे. अशा सरकारचा बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला बोलतो. आम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केल्यावर आम्हाला नोटीस पाठवतो. महाराष्ट्रात निवडणुकीत या लोकांनी पैशांचा पाऊस पाडला. हेलिकॉप्टरमधून पैसे उतरवले गेले. खोके घेणारे लोक आम्हाला नोटीस पाठवताय? आमच्यावर खटला भरायचा आहे तर त्यांनी कोर्टात जावं. आम्ही वाट पाहतोय. 4 जूननंतर मजा आने वाला है. आम्ही घाबरणारे लोक नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

या देशात सत्य बोलणाऱ्याविरोधात खटला चालवला जातो. एफआयआर दाखल केला जातो किंवा आमच्या सारख्यांना तुरुंगात टाकलं जातं. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुन्हा तुरुंगात जात आहेत. आम्ही सत्य बोलल्याने तुरुंगात जाऊन बाहेर आलो. आम्ही घाबरत नाही, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

‘योग साधनेचा अपमान’

निवडणूक आयोगाला हाताशी पकडून आपल्या सोयीच्या तारखा पंतप्रधानांनी घेतल्या. पंतप्रधानांनी शेवटच्या टप्प्यात स्वतःचं मतदान ठेवून घेतलं. सेलिब्रिटीही त्यात आले. निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही तर राजकारणातल्या सेलिब्रिटींची सोय बघतो. हे सत्य आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ध्यानमग्न माणूस जो असतो तो कॅमेऱ्याकडे बघत नाही. आणि सगळ्या अँगलने टीव्हीसमोर येत नाही. पण तिथे 27 कॅमेरे लावलेत. जणू या ध्यानमग्न पुरुषाचे 27 कॅमेरे हे शिष्य आहेत. कुठूनही पाहा सगळे अँगल आहेत. कुठूनही बघा, त्यांचा कानही दिसतोय. चौतरफा कॅमेरे लावून एक माणूस ध्यानमग्न होतो, हा आपल्या योग साधनेचा अपमान आहे, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.

‘संपूर्ण देशाची चॉईस राहुल गांधी’

लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघडीचाच विजय होणार. 4 जूनला दुपारी बारा वाजेनंतर ‘इंडिया’ आघाडी जिंकतेय हे सर्वांना दिसेल. पंतप्रधान ‘इंडिया’ आघाडीचा असेल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, त्यांची चॉईस राहुल गांधी आहेत. मात्र संपूर्ण देशाची चॉईस राहुल गांधी आहेत. आम्ही सगळे राहुल गांधींसोबत आहोत. राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे देशभर फिरून मेहनत घेतली आहे. या निवडणुकीत विरोधकांच्या चिंधड्या उडवल्या आहेत, ते पाहता राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यात सक्षम असल्याचे देशावासीयांनी स्वीकारल्याचे संजय राऊत म्हणाले.

‘हा 36 तासांचा मोठा ड्रामा’

कन्याकुमारीत मेडिटेशन नाही, हा 36 तासांचा मोठा ड्रामा आहे. 27 कॅमेरे लागले आहेत. प्रत्येक अँगलने पंतप्रधान तुम्हाला दिसताहेत. ध्यानस्थ व्यक्तीचा जो भाग बघायचा आहे, ते कॅमेऱ्याच्या अँगलमधून पाहू शकतो. डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत सर्वत्र कॅमेरे लावले आहेत. त्यांना ध्यान करायचे आहे. ऋषी, मुनी, तपस्वी रामायण, महाभारत, पुराण काळात ध्यान-तपस्या करत होते. पण त्यांच्याकडे कॅमेरे नव्हते. कोणी त्यांच्या आसपासही फिरकत नव्हतं, ना सुरक्षा रक्षक होते. तीन हजार सुरक्षा रक्षक तैनात करून पूर्ण परिसर बंद केला आहे. तिथली दुकानं, रस्ते, वाहतूक पूर्ण बंद केली आहे. अशी ही ध्यानधारणा आहे. आपल्यावर फोकस लावा आणि वाराणसीच्या लोकांनी मला मत द्या, असा हा प्रचार आहे. निवडणूक आयोग हे सर्व बघतोय. पण निवडणूक आयोगाचा हा अंधा कानून आहे, असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.