भारताच्या निवडणुका संपत असतानाच इंग्लंडमध्ये निवडणुका जाहीर झाल्या. इंग्लंडच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम फक्त 25 दिवसांत संपेल. पंतप्रधान सुनक यांच्यासमोर आव्हान आहे ते बेरोजगारीचे व इंग्लंडमधील वाढत्या गुन्हेगारीचे. सत्ताधारी आणि विरोधक फक्त राष्ट्रीय मुद्दय़ांवरच बोलतात. भारताप्रमाणे प्रचाराची पातळी घसरलेली नाही. सुनक यांनी इंग्लंडमध्ये ‘अग्निवीर’ योजना जाहीर केली. त्यावर येथेही वादळ उठले. तरीही इंग्लंडमध्ये त्यांची राज्यघटना मजबुतीने उभी आहे!
भारतातील लोकसभा निवडणुका संपल्या आहेत व 4 जून रोजी निकाल लागतील. स्कॉटलंडमध्ये उतरताच इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या व निवडणूक प्रचाराची सुरुवात स्काटलंडमधून करण्याचे जाहीर केले. इंग्रजांनी भारत सोडताना आपल्याला लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य अशा काही महान गोष्टी सोपवून गेले. इंग्लंडने साम्राज्यवादाचे पंख फैलावले, पण लोकशाहीचा पाया ढासळू दिला नाही. आज चित्र असे आहे की, फक्त सत्तर वर्षांत भारताने लोकशाहीचा साफ कचरा केला. गेल्या दहा वर्षांत तो सगळय़ात जास्त झाला, पण इंग्लंडमध्ये लोकशाहीची मशाल पेटताना दिसत आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे लोकशाही मार्गाने संसदेत निवडून आले व इंग्लंडच्या संकटकाळात ते त्या महान देशाचे पंतप्रधान झाले. ज्या देशावर आम्ही राज्य केले त्या देशाचा माणूस आम्हाला पंतप्रधान म्हणून चालणार नाही, असे गळा फाडून बोलणारा नकली राष्ट्रवाद तेथे सुनक यांना विरोध करण्यास उभा राहिला नाही. सादिक खान हे सध्या लंडनचे मेयर आहेत. सादिक खान हे लंडनसारख्या शहराचे महापौर झाले तर लंडनमधील मुसलमान हे तेथे राहणाऱया इतर धर्मीयांच्या गळय़ातील ‘सोने’ लुटून नेतील, असा प्रचार पंतप्रधान सुनक यांनी केल्याचे दिसत नाही. अत्यंत शांतपणे पंतप्रधान सुनक यांनी निवडणुकांची घोषणा केली. सुनक यांनी जाहीर केले की, त्यांनी ‘राजा’कडे संसद बरखास्त करून निवडणुका घेण्याची परवानगी मागितली आहे. सर्वकाही संविधानानुसार घडले. सुनक व त्यांच्या पक्षाला प्रचारासाठी सोयीचे व्हावे म्हणून निवडणूक आयोगावर दबाव आणून सात टप्प्यांत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या नाहीत हे महत्त्वाचे. निवडणुका एकाच दिवशी 4 जुलै रोजी होतील. संसदेचा अखेरचा दिवस 24 मे असेल. 30 मे रोजी संसद रीतसर संपवून पुढील 25 ‘वर्किंग डेज’ (working days) नंतर निवडणुका घेतल्या जातील. ब्रिटिश संसदेच्या Fixed term parliament Act 2011 नुसार ही कार्यवाही सहज पार पडली.
भारतात हे गेल्या दहा वर्षांत घडले नाही. संसदेची इमारत बदलली. कपाळावर भस्म-चंदन लावून मोदी नावाची व्यक्ती हातात ‘सेंगाल’ घेऊन वावरली. त्याचे लोकशाही, संसदेची प्रतिष्ठा याच्याशी काहीच देणे नव्हते. भारतीयांना स्वातंत्र्य दिले तर ते विकून खातील, हे चर्चिलचे बोल मागच्या दहा वर्षांत खरे ठरवणारे काम मोदी व त्यांच्या लोकांनी केले.
सुनक जिंकतील?
सुनक हे रिचमंड (यार्क) संसदीय क्षेत्रातून निवडून येतात. 1910 पासून ही जागा कान्झर्वेटिव (Conservative) पक्षाकडे आहे व सुनक याच मतदारसंघातून पुन्हा निवडून येतील असे चित्र आहे. सुनक हे सध्या त्यांच्या मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मतदारसंघातील पब्स, क्लबमध्ये जाऊन ते तरुण व वृद्धांशी चर्चा करतात. त्यांच्याबरोबर चहा घेतात, गप्पा मारतात. मतदारसंघातील माजी सैनिकांच्या भविष्याविषयी बोलतात. सुनक व त्यांच्या विरोधकांचा प्रचार भरकटलेला नाही. राष्ट्रीय प्रश्नांवरच ते बोलतात. भारताप्रमाणे वैयक्तिक उणीधुणी काढून पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मलिन करण्याचे काम श्री. सुनक करीत नाहीत. सुनक यांचा धर्म हिंदू. त्यांच्या देशात ते अल्पसंख्याक आहेत. त्यांचे विरोधक ते अल्पसंख्याक असल्याचा मुद्दा कोठेच आणत नाहीत. भारतात ‘अग्निवीर’ योजना प्रचारात गाजली. बेरोजगारांना नोकऱयांचे आमिष दाखवून चार वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने सैन्यात नोकरी दिली जाते. ही अग्निवीर योजना म्हणजे सैन्याचा अपमान व तरुणांशी धोका असल्याचा प्रचार राहुल गांधी व इतर मोदीविरोधकांनी केला. आश्चर्य असे की, सुनक साहेबांनी त्यांच्या प्रचारात इंग्लंडच्या तरुणांसाठी वेगळय़ाच अग्निवीर योजनेची घोषणा केली. 18 वर्षांवरील तरुणांना ‘राष्ट्रीय सेवा’ देण्यासाठी सैन्यात भरती करण्याची ही योजना त्यांच्या देशातदेखील वादग्रस्त ठरत आहे. सुनक हे प्रचारात सांगतात, 18 वर्षांखालील तरुणांना सैन्यात पूर्ण वेळ नोकरी मिळेल किंवा ज्यांना अल्पकालीन सेवा बजावायची आहे त्यांना ती संधी मिळेल. एकूण काय, भारत आणि ब्रिटनमध्ये बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी लष्कर हे एकमेव क्षेत्र उरले आहे. सुनक यांच्या विरोधकांनी इंग्लंडच्या अग्निवीर योजनेस विरोध केला. ही सरळ धूळफेक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 18 वर्षांवरील तरुणांना सैन्यात कोणते काम मिळेल? सुनक यांनी सांगितले, त्यांच्या देशाला आंतरिक व बाहय़ शक्तींपासून धोका निर्माण झाला आहे. सैन्यात सायबर प्रोटेक्शन, नागरी सेवा अशा अनेक विभागांत नोकऱया निर्माण होतील. तरुणांना ब्रिटिश सैन्याचा गणवेश चढवून राष्ट्रीय सुरक्षेसाठी सेवा बजावता येईल. सुनक यांनी अग्निवीर योजना जाहीर करून प्रचारात नवा मुद्दा आणला. ब्रिटनमध्ये बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. भररस्त्यावर चोऱया होतात. हातातील घडय़ाळं, दागिने, मोबाईल खेचून नेले जातात. हे बेरोजगारीचे कारण. सुनक हे निवडणूक हरले तर बेरोजगारी व गुन्हेगारी हे मुख्य कारण ठरेल.
25 दिवसांचा प्रचार
भारतातील सार्वत्रिक निवडणूक सात टप्प्यांत झाली. 50 दिवसांपेक्षा जास्त प्रचार झाला. इंग्लंडचा प्रचार 25 दिवसांत संपेल. हे 25 दिवसही खूप झाले असे येथील लोकांचे मत पडले. इंग्लंडमध्ये सध्या लाँग वीकेंड आहे. लोक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत आहेत. रविवारी संपूर्ण लंडन सायकलस्वारांचा होतो. हजारो सायकलस्वार लंडनच्या रस्त्यांवर होते व त्यांना उत्तेजन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. त्यांच्यात प्रचारासाठी एकही नेता घुसला नाही. कोणत्याही निर्बंधांशिवाय जनता तेथे उपस्थित होती. फुटबालच्या सामन्यांसाठी लोक अनेक ठिकाणी जमले. हाटेल, रेस्टारंट, पब्जमध्ये बीअर व मद्याचे ग्लास समोर ठेवून लोक फुटबालचे सामने बघत होते. निवडणुकांच्या भानगडीचे उद्या पाहू. आज आनंद उपभोगून घ्या. वाहिन्यांवर फुटबालचे सामने सुरू असताना त्यांचे प्रक्षेपण थांबवून पंतप्रधान सुनक मध्येच पडद्यावर आले व प्रचाराचा नारळ फोडून गेले असेही दिसले नाही. एक तर राजकारणी सभ्यता पाळतात व जनता नेत्यांचा फालतूपणा सहन करत नाहीत. भारतीय राजकारणी लंडनला फिरायला येतात, पण जाताना लंडनची राजकीय सभ्यता येथेच ठेवून जातात.
इंग्लंडमध्ये डॉ. आंबेडकर
लंडनच्या किंग हेन्री रोडवर 1920-21 या अल्पकाळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते. ही वास्तू महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतली व तेथे एक स्मारक केले. मंगळवारी त्या स्मारकास भेट दिली तेव्हा क्षणभर रोमांचित झालो. येथे भारतीय घटनेचे शिल्पकार व शोषितांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणाऱया डॉ. आंबेडकरांचे वास्तव्य होते असे सांगणारी निळय़ा रंगाची पाटी घराच्या भिंतीवर ब्रिटिश सरकारने लावली आहे. दोन मजल्याचे हे घर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासातील काही छायाचित्रे यातील काही दालनांत आहेत. काळाराम मंदिर, महाडच्या चवदार तळय़ाचा संघर्ष, डॉ. आंबेडकरांनी पंडित नेहरूंच्या उपस्थितीत कायदा मंत्री म्हणून घेतलेली शपथ अशी चित्रे तेथे आहेत. बिर्ला हाऊसला संध्याकाळच्या प्रार्थनेदरम्यान महात्मा गांधींची हत्या होताच तेथे घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचणाऱयांत डा. आंबेडकर होते. घटनास्थळावरचे दुर्मिळ चित्र त्या दालनात आहे. डॉ. आंबेडकरांनी भारत देशाला घटना दिली. भारताच्या घटनेवर इंग्लंडची छाप असल्याची टीका तेव्हा विरोधकांनी केली, पण इंग्लंड देशात घटनेनुसारच राज्य चालले आहे आणि भारतात डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या घटनेची अवहेलना रोजच सुरू आहे. नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाहीच. आलेच तर डॉ. आंबेडकर व त्यांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेलाच ते आग लावतील, असा विचार इंग्लंडमधील डॉ. आंबेडकरांच्या वास्तूत वावरताना आला. दुसऱया मजल्यावर डॉ. आंबेडकरांचा चष्मा ठेवला आहे, पण आजचे राज्यकर्ते दृष्टिहीन बनले आहेत. आंबेडकरांचा शयनकक्ष तेथे आहे. या महामानवाने काही काळ येथे विश्रांती घेतली असेल व आपल्या देशातील शोषितांचा लढा उभारण्यासाठी ते भारतात परतले. अविश्रांत काम केले. ‘मूकनायक’चे काही अंक भिंतीवर लावले आहेत. त्यातील त्यांच्या एका लेखाचे शीर्षक आहे- “स्वराज्याची सर सुराज्याला नाही.” आजच्या काळातही ते पटणारे आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून स्वराज्य व स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे राजकारण भारतात झाले. आंबेडकरांना ब्रिटिशांच्या सुराज्यापेक्षा स्वराज्य हवे होते. राज्य कसे करावे याचा धडा डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या याच लेखात दिला. ते सांगतात, “शासन करणे म्हणजे प्रजेस अमुक करू नका व करून शांतता मोडल्यास दंड होईल, असे बजावणाऱया राज्यपद्धतीला हल्लीच्या काळी तारतम्याने रानटी म्हणावे लागेल. सुधारलेल्या राष्ट्रातील राज्यपद्धतीचा कल जितका शासनाकडे असतो तितकाच संस्कृतीकडेही असतो. आहे त्यापेक्षा प्रजेची उन्नती अधिक कशी होईल याचे मार्ग आखणे, तिची साधने सर्वांना सारखी उपलब्ध करून देणे, उन्नतीस अनुकूल अशी परिस्थिती उत्पन्न करणे हा राज्य करण्याचा दुसरा हेतू शासनाइतका, किंबहुना अधिक महत्त्वाचा होऊन बसला आहे.”
डॉ. आंबेडकरांच्या जीवनात व कार्यात नैतिकतेला सर्वोच्च स्थान होते, असे इंग्लंडमधील त्यांच्या वास्तूच्या भिंतीवर कोरले आहे.
भारतात त्याच नैतिकतेच्या नावाने ठणठणाट आहे.
Twitter @rautsanjay61
Gmail – [email protected]