अभिप्राय – हरवल्याचे शल्य उरताना…

>> शुभांगी पासेबंद

’शिल्लक कविता’ हे रवी ठाकूर यांनी लिहिलेले कवितेचे पुस्तक. काहीतरी हरवल्याचे शल्य कलाकार जाणतो. या ‘शिल्लक कविता’ कवितेच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे,
किती लिहिल्या, किती फाडल्या
काही जाळल्या, काही टाळल्या
काही कुठे ठेवल्या, काही कुठेतरी गेल्या
काही कुठेतरी हरवल्या, काही मनातच राहिल्या
काही शोधल्या, काही सापडल्या
जीवनाचाही असंच असतं
जीवनाच्या कागदावर काही लिहिलं, पुसलं गेलं
कुणी कुणी काय काय लिहिलं
पण शेवटी उरल्या, राहिल्या, त्या कविता ’शिल्लक कविता’

या पुस्तकाला पी. विठ्ठल यांची प्रस्तावना मिळाली आहे. या पुस्तकाचे अर्पण कविता लेखकाने स्वतच्या कवितांनाच केले आहे. पानोपानी अप्रतिम रेखाचित्रे आहेत, जी तुषार देसाई यांनी काढली आहेत. मुखपृष्ठदेखील त्यांचेच आहे.
पुस्तकात 36 कविता अदमासाच्या कविता आहेत. त्या पुढच्या कविता स्व-शोधाच्या कविता आहे आणि 62 कविता सलोकतेच्या कविता आहेत. पुढे वळण असून त्या पुढील आठ कविता मग्नतेच्या कविता आहेत.

हे विश्लेषण, ही वर्गवारी करायलासुद्धा आपल्याला त्या कविता वाचायलाच हव्यात. रेखाचित्रे खूप सुंदर आहेत. आपण वर्गात, शाळेत, कॉलेजमध्ये असताना वहीच्या मागच्या पानावर जसे पेनने पेन्सिलने खरडतो ना, त्यातसुद्धा जो सुंदर भाव आणि सुंदर अप्रतिम असा देखावा असायचा, तसा या रेखाचित्रांमध्ये आहे.

काही कवितांना वंचितांच्या कविता, असेदेखील म्हणता येणार नाही. अश्रूंच्या कवितासुद्धा म्हणता येणार नाही. ‘चिंचेच्या झाडावरचा हिरवा रावा’ वगैरे उल्लेख असला तरी त्यांना निसर्ग कवितासुद्धा म्हणता येणार नाही. तरी पण जीवन समृद्ध करण्याचा आशय कवितांमध्ये भरलेला आहे. पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य आहे.

शिल्लक कविता
लेखक : रवी ठाकूर
प्रकाशक : शब्द मल्हार प्रकाशन
पृष्ठे : 136
किंमत : रु. 275